(देवगड)
राज्याच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने धडक कारवाई केली आहे. देवगड समोरील समुद्रात गस्तीदरम्यान कर्नाटक राज्यातील ‘हनुमा वैभवा’ ही ट्रॉलिंग नौका अवैध मासेमारी करताना पकडण्यात आली. संबंधित नौकेकडे महाराष्ट्र सागरी हद्दीत मासेमारी करण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासात उघड झाले.
वेगवान पाठलागानंतर नौका ताब्यात
देवगड परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पथक समुद्रात नियमित गस्तीवर असताना १६ ते १८ वावा खोलीवर ही नौका ट्रॉलिंग करताना आढळली. गस्ती नौका दिसताच संबंधित नौकेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने वेगवान पाठलाग करून नौका ताब्यात घेतली.
सिंधुदुर्गातील दहावी, देवगडमधील चौथी कारवाई
देवगड पथकाची परप्रांतीय नौकांवरील ही चौथी मोठी कारवाई असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही एकूण दहावी कारवाई आहे. या नौकेवर तांडेलसह सात खलाशी होते. नौका देवगड बंदरात आणण्यात आली असून, पकडलेल्या मासळीचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावातून मिळणारी रक्कम शासकीय दरबारी जमा केली जाणार आहे.
कायद्यानुसार कठोर दंडाची कारवाई
ही कारवाई महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ तसेच सुधारित अधिनियम २०२१ अंतर्गत करण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अहवाल सादर करण्यात आला असून, सुनावणीनंतर संबंधित नौकामालकावर मोठी दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.
या मोहिमेत किरण वाघमारे यांच्यासह संतोष ठुकरुल, धाकोजी खवळे, योगेश फाटक, अमित बांदकर, नेसवंणकर आणि सावजी यांनी सहभाग घेतला.

