( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर देवरुख मार्ग सध्या मोठ्या चर्चेचा आणि चेष्टेचा विषय बनला असून पावसाने विश्रांती घेतल्या नंतर एक महिना उलटून गेला तरीही संगमेश्वर ते बुरंबी या मार्गावरील भयावह खड्डे भरण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याबद्दल वाहन चालकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या खड्ड्यामुळे सातत्याने अपघात घडत असून आज सकाळी साडेआठ वाजता मयूर बाग येथील शुभगंधा मंगल कार्यालया समोर एक दुचाकी खड्ड्यात आपटून घडलेल्या अपघातात मागे बसलेली तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या अपघातानंतर अनेक वाहन चालक अपघात स्थळी जमा झाले होते. सर्वांनीच या अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचा आरोप करत खड्डे भरण्यासाठी आता रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपस्थितांनी दिला.
संगमेश्वर ते बुरंबी या दरम्यान रस्त्याचा भाग शिल्लकच नसून वाहने गेल्यानंतर सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरत आहे. या मार्गाच्या दुतर्फा राहणाऱ्या नागरिकांच्या घरात दररोज धुळीचे लोट येऊन वृद्ध माणसांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. एवढं घडू नये सार्वजनिक बांधकाम विभाग देवरुख हे सारे निष्क्रियपणे पहात असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. संगमेश्वर ते बुरंबी हा मार्ग सध्या चर्चेचा आणि चेष्टेचा विषय बनला असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता खड्डे भरण्याचे केवळ आश्वासन देत आहेत. दोन डिसेंबर रोजी साडवली येथे खड्डे भरण्याचे काम थांबविण्यात आले आणि तेथून ही यंत्रणा अन्यत्र नेली गेली . खड्डे भरण्याचे हे काम अचानक का थांबवले ? याचा खुलासा बांधकाम विभागाने करणे आवश्यक आहे.
संगमेश्वर साखरपा राज्य मार्गाच्या दुरावस्थेबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम देवरूखचे उपअभियंता वैभव जाधव यांनी खड्डे भरण्याचे काम साखरप्या पासून देवरुख पर्यंत पूर्ण केल्याचा दावा केला होता. संगमेश्वर ते बुरंबी या मार्गावरील जीव घेणे खड्डे आठ दिवसात भरले जातील, असे आश्वासनही जाधव यांनी दिले होते. मात्र दोन डिसेंबर नंतर खड्डे भरण्याचे काम साडवली येथेच थांबले आहे. उप अभियंता जाधव यांनी दिलेले आश्वासन हवेतच विरले असल्याने वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आठवडाभरात जर संगमेश्वर बुरंबी दरम्यानचे खड्डे भरले गेले असते तर, आज सकाळी मयूरबाग येथे दुचाकीचा अपघात घडून तरुणी गंभीर जखमी झाली नसती.या अपघातानंतर माणुसकी म्हणून एका कारचालकाने गंभीर जखमी तरुणीला तातडीने दवाखान्यात दाखल केल्याने जखमी तरुणीचे नाव समजू शकले नाही. अपघाताप्रसंगी उपस्थित वाहन चालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला कोणतीही पूर्व सूचना न देता रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे यावेळी जाहीर केले.
सार्वजनिक बांधकाम विभाग देवरूखने संगमेश्वर ते लोवले दरम्यान महावितरणच्या ठेकेदाराने रस्त्याच्या साईड पट्टीवर बेजबाबदारपणे सिमेंट पोल उतरवून ठेवल्याचे लक्षात आणून दिल्यानंतरही कोणतीही कारवाई अद्याप न केल्याने येथेही गंभीर अपघात घडण्याची भीती वाहन चालक तसेच पादचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या सर्व प्रकारावरून सार्वजनिक बांधकाम विभाग देवरुख आपली जबाबदारी पार पाडण्यात असफल ठरत असल्याचे दिसून येत आहे.
फोटो :संगमेश्वर देवरुख मार्गावरील मयूरबाग येथे याच ठिकाणी शुभगंधा मंगलकार्यालयासमोर आज सकाळी दुचाकी खड्ड्यात आपटून मागे बसलेली तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

