(मुंबई)
यंदा राज्यात पावसानं जोरदार हजेरी लावली असून विशेषत: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजला आहे. शेतपिकांचं प्रचंड नुकसान झाल्याने विरोधकांनी राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारचे मंत्री दोन दिवसांपासून मराठवाडा दौऱ्यावर असून प्राथमिक पातळीवर मदतही करण्यात आली आहे.
अमित शाह यांना निवेदन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुंबईत भेट घेतली. महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना केंद्रातून भरीव आर्थिक मदत मिळावी, यासाठी निवेदन सादर करण्यात आलं. भेटीनंतर फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं, “महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संदर्भात सविस्तर निवेदन आज अमितभाई शाह यांना दिलं. एनडीआरएफमार्फत महाराष्ट्राला शेतकऱ्यांसाठी भरीव मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.”
मराठवाड्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान, जनावरांचे मृत्यू, नागरिकांच्या जखमा या सर्वांमुळे केंद्राकडून मदतीची अपेक्षा आहे. उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडून १० हजार कोटींची मदत द्यावी अशी मागणी केली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून ३० हजार कोटींच्या मदतीची मागणी केली आहे. त्यांनी बिहारमधील उदाहरण देत सांगितलं की, तिथं अशाच परिस्थितीत केंद्राने ३० हजार कोटींची मदत दिली होती. यामुळे आता केंद्र सरकार महाराष्ट्राला किती मदत जाहीर करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

