(पुणे)
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक निखिल कैलास रणदिवे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निखिल रणदिवे हे यवत पोलीस ठाण्यांतर्गत असणाऱ्या केडगाव पोलीस चौकीला कार्यरत होते. रणदिवे यांनी सोशल मीडियावर भावपूर्ण पोस्ट शेअर करत आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला उपस्थित राहू शकत नसल्याबद्दल खेद व्यक्त केला. त्यांनी स्वतःच्या फोटोवर भावपूर्ण श्रद्धांजली लिहून पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. रणदिवे काही दिवसांपासून बेपत्ता आहेत आणि त्यांचा फोन बंद आहे.
रणदिवे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, “माझी प्रिय दिदी, आज तुझा पहिला वाढदिवस आहे. मला तुला चांगल्या प्रकारे वाढदिवस साजरा करून देण्याची इच्छा होती, पण मी पोलीस नोकरी करतो, जिथे वरिष्ठांची मनमानी चालते. मला नाशिक, जळगाव, अहिल्यानगर येथे नेमल्यामुळे तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकले नाही.”
उपलब्ध माहितीनुसार, निखिल रणदिवे यांची मागील वर्षी शिक्रापुर पोलीस ठाण्यात बदली झाली होती. मात्र यावत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी त्यांना कार्यमुक्त न करता मानसिक त्रास दिला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी स्पष्ट केले की, “देशमुख यांच्या सततच्या त्रासामुळे मी आत्महत्त्या करत आहे. माझ्या मृत्यूसाठी ते जबाबदार आहेत.”
या घटनेमुळे यवत पोलीस ठाण्यात मोठी खळबळ उडाली असून, वरिष्ठ पातळीवर याबाबत तातडीने हस्तक्षेप करण्यात आला असून पोलीस नाईक रणदिवे यांची सुरक्षितता पाहण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान या संपूर्ण प्रकरणात यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी आरोप फेटाळले आहेत. माझ्यात आणि रणदिवे यांच्यामध्ये कोणतेही गैरसमज नव्हते मतभेद नव्हते. मी कधीही त्यांना त्रास देत नव्हतो, मागील काही दिवसापूर्वी त्यांची शिक्रापूर येथे विनंती अर्जाने बदली झाली होती, मात्र त्यांच्याकडे काही दाखल गुन्ह्यातील कामकाज पूर्ण करणे बाकी होते ते पूर्ण करून त्यांना आपण सोडणार होतो. सध्या रणदिवे यांच्या शोधकामी पोलीस पथक रवाना केली असून त्यांचा आम्ही शोध घेत आहोत असं देशमुख यांनी म्हटल आहे.

