( संगमेश्वर / प्रतिनिधी )
दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी श्री वाघजाई ग्रामदेवता क्रीडा मंडळ, तेरे यांच्या वतीने कबड्डी स्पर्धेच्या नियोजनासाठी बैठक श्री वाघजाई मंदिर येथे संपन्न झाली. या सभेस मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी श्री वाघजाई मंदिराचे विस्वस्त पदाधिकारीही उपस्थित होते.
मागील पाच वर्षांपासून श्री वाघजाई ग्रामदेवता क्रीडा मंडळाच्या माध्यमातून विविध क्रीडा स्पर्धांसह सामाजिक व धार्मिक उपक्रम सातत्याने व यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहेत. सर्व स्तरातील लहान-मोठ्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन खांद्याला खांदा लावून केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. क्रीडा मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमांना सन्माननीय देणगीदारांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
या सहकार्याच्या बळावर मंदिर परिसरात भाविकांसाठी स्वच्छ व थंड पाण्याची पाणपोई उभारण्यात आली असून, संपूर्ण मंदिर परिसर अधिक प्रकाशमान करण्यासाठी भव्य-दिव्य प्रकाशयोजना राबवून आकर्षक दीपस्तंभ उभारण्यात आले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी होणारी गैरसोय दूर झाली आहे. सध्या मंदिराच्या विकासात्मक कामांनाही गती देण्यात येत आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी श्री वाघजाई ग्रामदेवता क्रीडा मंडळाच्या वतीने विस्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रकाश दळवी यांच्याकडे रुपये ५१,०००/- (अक्षरी रुपये एकावन्न हजार फक्त) रोख स्वरूपात देणगी सुपूर्द करण्यात आली आहे.
श्री वाघजाई मंदिरात साजरा होणारा दीपोत्सव हा नाविन्यपूर्ण उपक्रम ठरत असून, भाविकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. भविष्यातही आवश्यक व उपयुक्त सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प क्रीडा मंडळाने व्यक्त केला आहे. दरम्यान, दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी श्री वाघजाई ग्रामदेवता मंदिर विस्वस्त मंडळाची सभा संपन्न झाली. या सभेमध्ये श्री वाघजाई ग्रामदेवता क्रीडा मंडळाच्या सामाजिक, धार्मिक व विकासात्मक कार्याचे विशेष कौतुक करत औपचारिक ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

