( रत्नागिरी )
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, ७ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांत महायुतीला मिळालेल्या मोठ्या यशामुळे विरोधकांची कोंडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत वर्चस्व राखण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राज्यात पहिली मोठी आघाडी घेतली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज पंचायत समिती गणातून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार डॉ. पद्मजा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांत बिनविरोध निवडून येणाऱ्या त्या पहिल्या उमेदवार ठरल्या आहेत.
ही बिनविरोध निवड उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्या बालेकिल्ल्यातून झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी डॉ. कांबळे यांच्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. परिणामी, त्यांचा एकमेव अर्ज वैध ठरल्याने बिनविरोध निवड निश्चित झाली.
सामंतांचा बालेकिल्ला पुन्हा सिद्ध
रत्नागिरी हा उदय सामंत यांचा राजकीय बालेकिल्ला मानला जातो. यापूर्वी नगर परिषद निवडणुकांतही शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले होते. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांपूर्वीच नाणीज गण बिनविरोध जिंकून सामंत यांनी आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पद्मजा कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती.
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट
आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने नाणीज गणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र दुपारपर्यंत कोणत्याही पक्षाकडून किंवा उमेदवाराकडून अर्ज दाखल न झाल्याने डॉ. कांबळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
विजयी सलामीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह
प्रत्यक्ष मतदानाआधीच शिवसेनेने पहिली जागा आपल्या खात्यात जमा केल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. डॉ. पद्मजा कांबळे यांच्या रूपाने एक सुशिक्षित आणि सक्षम चेहरा पंचायत समितीवर जाणार असल्याने ग्रामस्थांमध्येही समाधान व्यक्त होत आहे. या बिनविरोध विजयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील उर्वरित पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जागांवरही शिंदे शिवसेनेचे पारडे जड राहण्याची शक्यता वर्तवली जात असून, विरोधकांसमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिले आहे.

