(नवी दिल्ली)
केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला असून, दूरसंचार विभागाची (DoT) पेन्शन व्यवस्थापन प्रणाली ‘SAMPANN’ आता ‘UMANG’ पोर्टलशी जोडण्यात आली आहे. डिजिटल इंडियाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल देशभरातील सुमारे ४ लाख दूरसंचार पेन्शनधारकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या एकत्रीकरणामुळे आता पेन्शनधारकांना पेन्शनविषयक कामांसाठी वारंवार सरकारी कार्यालयांत जावे लागणार नाही. UMANG मोबाईल ॲप किंवा वेब पोर्टलच्या माध्यमातून पेन्शनशी संबंधित अनेक सेवा घरबसल्या, मोबाईलवरूनच उपलब्ध होणार आहेत.
नव्या सुविधेमुळे पेन्शनधारक कधीही आणि कुठूनही आपला PPO (Pension Payment Order) क्रमांक तपासू शकतील. तसेच जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) वैध आहे की नाही, याची माहितीही थेट UMANG ॲपवर मिळणार आहे. यामुळे वेळ, खर्च आणि गैरसोयी टळून पेन्शनधारकांचा मोठा दिलासा होणार आहे.
डिजिटल सेवा अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा हा महत्त्वाचा भाग मानला जात असून, भविष्यात पेन्शनधारकांसाठी आणखी सेवा UMANG पोर्टलवर उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

