(अमरावती)
नव्या आयुष्याची स्वप्नं पाहत विवाहबंधनात अडकलेल्या नववधू आणि दोन्ही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला. लग्न झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासांतच नवरदेव अमोल गोडबोले (पुसला, वरुड) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झाला. आनंदाच्या वातावरणात काही क्षणातच शोककळा पसरली.
वरुड तालुक्यातील पुसला गावचे कोतवाल अमोल गोडबोले मंगळवारी सकाळी नागपूर येथील वधूसोबत विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात थाटामाटात विवाहबद्ध झाले. मंगळाष्टक, पुष्पहार, आशीर्वाद आदी सर्व विधी पार पडल्यावर पाहुणे भेटीसाठी उभे असतानाच अमोल अचानक कोसळले. त्यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर वरुडमधील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, अतितीव्र हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. नवरदेवाचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच लग्नमंडप क्षणात रिकामा झाला.
महसूल सेवक म्हणून कार्यरत असलेले अमोल गोडबोले गावात आणि कार्लायालात लोकप्रिय होते. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर रात्री पुसला येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तरुण वयात आणि लग्नाच्या दिवशीच झालेल्या या मृत्यूने संपूर्ण गाव शोकाकुल झाला आहे.
हृदयविकाराच्या झटक्याची महत्त्वाची लक्षणे
तज्ञांच्या मते, झटका येण्याच्या आधी साधारण अर्धा तास पुढील लक्षणे दिसू शकतात :
- छातीत तीव्र वेदना (विशेषतः डाव्या बाजूस), छातीत धडधडणे
- हात, मान, पाठीमध्ये वेदना पसरत जाणे
- श्वास घेण्यास त्रास, धाप लागणे
- अचानक घाम येणे, खूप थकवा जाणवणे
- चक्कर येणे, डोके दुखणे, किंवा अस्वस्थ वाटणे
- अपचनासारख्या समस्या (विशेषतः स्त्रियांमध्ये)
ही लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय मदत घेणे अत्यावश्यक आहे.

