नासाची अनुभवी आणि जागतिक स्तरावर लोकप्रिय अंतराळवीर, भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स यांनी तब्बल २७ वर्षांची प्रदीर्घ आणि ऐतिहासिक सेवा बजावल्यानंतर निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांची निवृत्ती २७ डिसेंबर २०२५ पासून प्रभावी झाली असून, या निर्णयासह मानवी अंतराळ उड्डाणाच्या एका महत्त्वपूर्ण युगाचा शेवट झाला असल्याचे मानले जात आहे.
सुनीता विलियम्स यांनी आपल्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर तीन मोहिमा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. मानवी अंतराळ उड्डाणात त्यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर कोरले. भारतीय वंशाच्या या अंतराळवीराविषयी भारतात विशेष आपुलकी असून, निवृत्तीनंतर त्या भारतात येऊन अंतराळ विज्ञानाबाबत मार्गदर्शन करावे, अशी भावना अनेकांकडून व्यक्त होत आहे.
नासाच्या माहितीनुसार, सुनीता विलियम्स यांनी एकूण ६०८ दिवस अंतराळात वास्तव्य केले. कोणत्याही महिला अंतराळवीरापेक्षा सर्वाधिक वेळ अंतराळ स्थानकात राहण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यांनी ९ वेळा स्पेसवॉक करत एकूण ६२ तास ६ मिनिटे अवकाशात चालण्याचा विक्रम केला आहे. महिलांमध्ये हा सर्वाधिक, तर एकूण स्पेसवॉक वेळेत त्या चौथ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय, अंतराळात मॅरेथॉन धावणारी पहिली अंतराळवीर म्हणूनही त्या ओळखल्या जातात.
नासाचे प्रशासक जॅरेड आयजॅकमॅन यांनी सुनीता विलियम्स या मानवी अंतराळ उड्डाणातील अग्रणी असल्याचे सांगितले. त्यांच्या नेतृत्वामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर भविष्यातील मोहिमांसाठी भक्कम पायाभरणी झाली असून, त्यातून चंद्रासाठीच्या ‘आर्टेमिस’ मिशनला तसेच भविष्यातील मंगळ मोहिमांना गती मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुनीता विलियम्स यांनी डिसेंबर २००६ मध्ये स्पेस शटल ‘डिस्कव्हरी’द्वारे पहिली अंतराळ झेप घेतली. त्यानंतर २०१२ मध्ये कझाकिस्तानच्या बॅकोनुर कॉस्मोड्रोममधून त्यांनी दुसरी अंतराळ मोहीम पूर्ण केली. त्या काही काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या कमांडरही होत्या. जून २०२४ मध्ये बोईंग स्टारलाईनर मिशनअंतर्गत त्या पुन्हा अंतराळात गेल्या आणि मार्च २०२५ मध्ये पृथ्वीवर परतल्या.
नासाच्या जॉनसन स्पेस सेंटरच्या संचालक वनेसा वायचे यांनी सुनीता विलियम्स यांच्या नेतृत्वगुणांचे, धैर्याचे आणि मोहिमांप्रती असलेल्या समर्पणाचे विशेष कौतुक केले. त्यांच्या कारकिर्दीमुळे अनेक तरुणांना अंतराळ क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवृत्तीनंतर सुनीता विलियम्स यांनीही भावना व्यक्त करत सांगितले की, अंतराळ हे त्यांचे अत्यंत आवडते ठिकाण होते. तिथे इतका दीर्घकाळ काम करण्याची संधी मिळणे हा सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या मोहिमांमुळे नासाला चंद्र आणि मंगळ मोहिमांसाठी पुढचा मार्ग मोकळा झाला, हे ऐकून समाधान वाटत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

