(रत्नागिरी)
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. मंगळवार, २० जानेवारी रोजी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी विविध तालुक्यांत उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी ७१ तर पंचायत समितीसाठी १२४ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
अर्ज भरण्याच्या पहिल्या दोन दिवसांत प्रक्रिया संथ होती. मात्र सोमवारी अर्जांची संख्या वाढू लागली आणि काल मंगळवारी २० जानेवारी रोजी एकाच दिवसात मोठी उसळी घेतली. या दिवशी जिल्हा परिषदेसाठी ६० तर पंचायत समितीसाठी तब्बल १०८ नवीन अर्ज प्राप्त झाले.
तालुकानिहाय पाहता चिपळूणमध्ये निवडणुकीची सर्वाधिक चुरस दिसून येत आहे. येथे आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी १७ तर पंचायत समितीसाठी २६ अर्ज दाखल झाले आहेत. खेड तालुक्यात पंचायत समितीसाठी सर्वाधिक ४० अर्ज आले असून जिल्हा परिषदेसाठी १६ अर्ज प्राप्त झाले आहेत.
दापोली तालुक्यातही उमेदवारांचा उत्साह लक्षणीय असून येथे एकूण २५ अर्ज दाखल झाले आहेत, यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ११ आणि पंचायत समितीसाठी १४ अर्जांचा समावेश आहे. गुहागर तालुक्यात २८ तर रत्नागिरी तालुक्यात १९ एकूण अर्ज दाखल झाले आहेत.
लांजा तालुक्यात अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नसून, राजापूर तालुक्यात केवळ ३ अर्ज प्राप्त झाले आहेत.
अंतिम दिवशी गर्दी वाढण्याची शक्यता
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असल्याने, शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः लांजा आणि राजापूर तालुक्यांत उशिरा हालचाली वाढण्याची शक्यता आहे.
राजकीय पक्षांकडून ‘ए’ आणि ‘बी’ फॉर्म शेवटच्या क्षणी देण्याची रणनीती अवलंबली जात असल्याने अर्ज प्रक्रियेत आज शेवटच्या दिवशी मोठी धावपळ होईल, अशी शक्यता आहे.

