(दापोली)
दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नवशी येथील विद्यार्थिनी प्रांजल सुषमा चंद्रकांत खळे हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इस्रोच्या अभ्यास दौर्यासाठी पात्र ठरून शाळेचा आणि गावाचा गौरव वाढवला आहे.
प्रांजलच्या या यशाबद्दल आयोजित सत्कारप्रसंगी मुख्याध्यापिका प्रज्ञा देवघरकर यांनी, “प्रांजलने नवशी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे,” असे गौरवोद्गार काढले. तर केंद्रप्रमुख संजय जंगम यांनी, “जिद्द, चिकाटी आणि सचोटी असेल तर कोणतीही परिस्थिती अडथळा ठरत नाही, हे प्रांजलने सिद्ध करून दाखवले आहे,” असे सांगितले.
घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही, तसेच मोबाईल फोन किंवा अन्य आधुनिक सोयी-सुविधा नसतानाही प्रांजलने अभ्यासातील सातत्य, जिज्ञासू वृत्ती आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले. तिच्या बुद्धिमत्तेची आणि कष्टांची दखल आज सर्वत्र घेतली जात आहे.
या यशामागे आरजू राठोड यांच्यासह मुख्याध्यापिका प्रज्ञा देवघरकर, शिक्षक दिपक जाधव व सोमनाथ माने यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे मोलाचे सहकार्यही तिला मिळाले.
प्रांजलच्या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, केंद्रप्रमुख संजय जंगम, सरपंच, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ आदींनी तिचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

