(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल येथील जिल्हा परिषद शाळा पाचल नंबर १ (केंद्र शाळा) परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने ग्रामस्थांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेच्या परिसरात तसेच आजूबाजूच्या भागात बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली आणि प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेतली.
शाळा परिसर आणि आसपासच्या भागात बिबट्याच्या हालचाली असण्याची शक्यता लक्षात घेऊन वन विभागाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. बिबट्याच्या वावरावर लक्ष ठेवण्यासाठी वन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून परिसरात आधुनिक नाईट व्हिजन ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या साहाय्याने दिवसा तसेच रात्रीच्या वेळी बिबट्याच्या हालचाली टिपण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बिबट्याचा नेमका वावर कोणत्या भागात आहे, तो कोणत्या दिशेने फिरतो आणि त्याच्या हालचालींचे स्वरूप काय आहे, याची माहिती मिळविणे शक्य होणार आहे.
शाळेच्या परिसरात बिबट्याचा वावर आढळल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी सावध राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. वन विभागाने घटनास्थळी पाहणी करून ट्रॅप कॅमेरे तैनात केल्याने बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. परिसरात बिबट्या आढळल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये. तसेच बिबट्याच्या हालचाली निदर्शनास आल्यास तातडीने वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. शाळा परिसरातील विद्यार्थ्यांची आणि ग्रामस्थांची सुरक्षितता लक्षात घेता वन विभागाच्या पुढील कार्यवाहीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


