(देवरूख)
संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी कडूवाडी येथे पार पडलेल्या टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत सिद्धेश्वर निवे संघाने विजेतेपद पटकावले. सरपंच कै. सौ. वैजयंती करंडे स्मृती चषकासह 25,555 रुपयांचे रोख बक्षीस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
ओम साई सेवा मंडळ कडूवाडी आणि निनावी देवी क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
अंतिम सामन्यात जेतवन तुळसणी संघाने उपविजेतेपद मिळवत 15,555 रुपये व चषक पटकावला. युवा स्पोर्ट्स देवरूख संघाने तृतीय क्रमांक मिळवला, तर ओम साई कडूवाडी संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. त्यांना अनुक्रमे 5,555 रुपये व चषक, तसेच 3,333 रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.
वैयक्तिक कामगिरीसाठी उत्कृष्ट फलंदाज मुशरफ मुकादम, उत्कृष्ट गोलंदाज गिरीश कोचिरकर आणि मालिकावीर पार्थ गांधी यांना चषक प्रदान करण्यात आले.
उद्घाटन व बक्षीस वितरण सोहळ्यास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, भाजप संघटक प्रमोद अधटराव, प्रफुल्ल बाईत, उद्योजक सुरेश कदम, युवा नेते प्रद्युम्न माने, सरपंच निकिता करंडे, उपसरपंच सुनील सावंत, राजू सावंत, दिलीप कडू, कडूवाडी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कडू, सायली सावंत, बाळकृष्ण करंडे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप कडू यांनी केले.
मनोगत व्यक्त करताना रोहन बने म्हणाले की, कडूवाडी मंडळाचे क्रीडा क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय असून दरवर्षी स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंना उत्तम व्यासपीठ मिळते. प्रफुल्ल बाईत यांनी स्पर्धेच्या नियोजनाचे कौतुक केले, तर उपसरपंच सुनील सावंत यांनी सातत्याने होत असलेल्या आयोजनामुळे ग्रामस्थांना दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळत असल्याचे सांगितले.
चार षटकांचे सामने ओपन व पंचक्रोशी स्तरावर कै. पांडुरंग करंडे व कै. शिवराम कडू क्रीडा नगरीत खेळवण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महेंद्र कडू, विशाल भडवलकर, जितेंद्र कडू, विकास कडू, प्रतीक कडू, विशाल कडू, प्रवीण करंडे, महेश सावंत, सखाराम रावणंग, प्रकाश रावणंग, अथर्व कडू यांच्यासह कडूवाडी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

