(संगमेश्वर / एजाज पटेल)
निवडणुकीत आश्वासनांची खैरात करायची आणि नंतर जनतेकडे पाठ फिरवायची, अशी राजकारणाची आजची वास्तवता बनली आहे. मात्र काही लोकप्रतिनिधी हे केवळ पदासाठी नव्हे, तर खऱ्या अर्थाने जनसेवेसाठी काम करतात, याचं प्रेरणादायी उदाहरण डिंगणी बागवानी कोंड येथे पाहायला मिळालं. उपसरपंच मिथुन मनोहर निकम यांनी गावातील अंधारमय आणि धोकादायक वाटेवर स्वखर्चातून तीन सौरदिवे बसवून ग्रामस्थांना दिलासा दिला आहे. या उपक्रमामुळे वर्षानुवर्षे अंधाराशी झुंज देणाऱ्या ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकताना दिसत आहे.
बैठकीत मांडली समस्या; उपसरपंचांनी दिला शब्द
मे महिन्यात बागवानी कोंड येथील स्थानिक आणि मुंबईस्थित ग्रामस्थांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. या बैठकीत वाडीतील मुख्य रस्ता रात्रीच्या वेळी पूर्णपणे अंधारात बुडत असल्याची गंभीर समस्या ग्रामस्थांनी मांडली. अंधारामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. त्यातच हिंस्त्र श्वापदांचा वावर आणि अपघाताची भीती कायम होती.
ग्रामस्थांच्या भावना ऐकल्यानंतर उपसरपंच मिथुन निकम यांनी तातडीने पुढाकार घेत, “शासकीय निधीची वाट पाहून गावकऱ्यांना अंधारात ठेवणार नाही. सौरदिव्यांची व्यवस्था मी स्वतःच्या खर्चातून करतो,” असा शब्द दिला होता.
शब्द पाळला; काही दिवसांतच वाडी उजळली
नेते अनेकदा आश्वासनं देतात, मात्र ती पूर्ण होताना क्वचितच दिसतात. पण मिथुन निकम यांनी दिलेला शब्द कृतीत उतरवून दाखवला. अवघ्या काही दिवसांतच त्यांनी तीन सौरदिवे उपलब्ध करून देत ते वाडीत बसवून घेतले. दिवे सुरू होताच अनेक वर्षांपासून अंधारात असलेला परिसर प्रकाशाने उजळून निघाला.
या सौरदिव्यांमुळे ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागला असून रात्रीच्या वेळी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
समाजकारणात कायम सक्रिय
मिथुन निकम हे स्थानिक पातळीवर नेहमीच सक्रिय आणि लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात. शासनाच्या विविध योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. ग्रामस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला असून, गरज पडल्यास उपोषणासारखे मार्गही अवलंबले आहेत. त्यांच्या संवेदनशील आणि आक्रमक कार्यपद्धतीमुळे ग्रामस्थांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष विश्वास निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांकडून कौतुक
उपसरपंचांच्या या उपक्रमामुळे बागवानी कोंड परिसरात समाधानाचे वातावरण आहे. संतोष काजरेकर यांच्यासह स्थानिक आणि मुंबईस्थित ग्रामस्थांनी मिथुन निकम यांचे आभार मानले आहेत.
“वर्षानुवर्षे रखडणारे काम उपसरपंचांनी स्वतःच्या खर्चातून तात्काळ पूर्ण करून दाखवले. असा लोकप्रतिनिधी मिळणे हे आमचे भाग्य आहे,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
मिथुन निकम यांच्या या कार्याची सध्या संपूर्ण संगमेश्वर तालुक्यात चर्चा होत असून त्यांच्या कामाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

