(रत्नागिरी /प्रतिनिधी)
मागील निवडणुकीप्रमाणेच यंदाही महायुतीतील जागावाटपात भाजपच्या पदरात निराशाच आली आहे. रत्नागिरी तालुक्यात पंचायत समितीसाठी शिंदेसेनेकडून भाजपला केवळ दोनच जागा देण्यात आल्या असून जिल्हा परिषदेसाठी एकही गट सोडण्यात आलेला नाही. त्यामुळे तालुक्यात यंदाही भाजपच्या हाती ‘भोपळाच’ राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपने समाधानकारक कामगिरी बजावली असली, तरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांत मात्र महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदेसेनेकडून भाजपची मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याचे दिसून येते. रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण १० गट आणि पंचायत समितीचे २० गण आहेत. मात्र, या संपूर्ण रचनेत भाजपला पंचायत समितीच्या केवळ दोन गणांवर समाधान मानावे लागले आहे.
सन २०१८ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही रत्नागिरी तालुक्यात भाजपला एकही जागा मिळवता आली नव्हती. पंचायत समितीतसुद्धा अवघ्या दोन जागांवरच पक्षाची गाडी थांबली होती. त्या वेळी गावखडी गणातून सुशांत शंकर पाटकर आणि शिरगाव गणातून स्नेहा सुहास चव्हाण हे भाजपचे उमेदवार निवडून आले होते.
लोकसभा निवडणुकीत खासदार नारायण राणे यांच्या विजयानंतर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली होती. मात्र, प्रत्यक्ष जागावाटपात पंचायत समितीच्या केवळ दोनच जागा मिळाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. जिल्हा परिषदेसाठी एकही गट न मिळाल्याने अस्वस्थता अधिक तीव्र झाली आहे. दरम्यान, भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भाजपला न्याय्य जागा देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यातून फारसे काही साध्य झाले नाही.
दोन जागांवर उमेदवार जाहीर
महायुतीच्या जागावाटपानुसार भाजपला मिळालेल्या दोन पंचायत समिती गणांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष दादा दळी यांना हरचेरी गणातून, तर माजी पंचायत समिती सभापती संजना माने यांना वाटद गणातून उमेदवारी देण्यात आली आहे. तथापि, एकूणच मर्यादित जागावाटपामुळे रत्नागिरी तालुक्यात भाजपची राजकीय घुसमट यंदाही कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

