(रत्नागिरी /प्रतिनिधी)
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला जिल्ह्यात हळूहळू गती येऊ लागली आहे. सोमवारी जिल्ह्यात जिल्हा परिषदेसाठी १० तर पंचायत समितीसाठी १५ असे एकूण २५ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी ५६ गटांमधून ११ आणि पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी १६ अर्ज दाखल झाले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसाठी ५६ गट आणि पंचायत समितीसाठी ११२ गणांची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली असून, येत्या ५ फेब्रुवारी रोजी मतदान तर ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असून, उद्या २१ जानेवारी ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.
अर्ज भरण्यासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक राहिल्याने, आज (मंगळवार) व बुधवार या दोन दिवसांत इच्छुक उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय हालचालींना वेग येत असून, विविध पक्ष व अपक्ष उमेदवारांकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, अंतिम अर्ज संख्येबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

