(देवळे / प्रकाश चाळके)
ज्ञानदानाचे पवित्र कार्य बजावत असतानाच शिक्षक गजानन मोघे यांची शाळेतच प्राणज्योत मालवली. संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील चाफवली शाळा क्रमांक १ येथे सोमवार, दि. १९ जानेवारी रोजी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे दुःखद निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गजानन मोघे यांनी कठीण परिस्थितीवर मात करत दहावीपासूनच देवळे हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाचा लाभ व्हावा, या उद्देशाने त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला आणि आयुष्यभर प्रामाणिकपणे अध्यापनात स्वतःला झोकून दिले.
घटनेच्या दिवशी चाफवली शाळा क्रमांक १ मध्ये शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरून दिल्यानंतर ते वर्गात ज्ञानदानाचे काम करत होते. त्याच वेळी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि ते खुर्चीवरच कोसळले. नेमके काय घडले हे विद्यार्थ्यांना समजले नाही. घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी तात्काळ इतर शिक्षकांना माहिती दिली. सहकारी शिक्षकांनी रिक्षामधून त्यांना देवळे येथे नेले. तेथील डॉक्टरांनी तातडीची गरज ओळखून पाली येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
गजानन मोघे गुरुजी यांनी सलग दोन वर्षे चाफवली शाळेतील दोन विद्यार्थ्यांची नासा–इस्रोसाठी निवड होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले होते. देवळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेतही ते सदस्य म्हणून कार्यरत होते. प्रामाणिक, मधाळवाणी, प्रेमळ, शांत, संयमी आणि काव्यशील व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या अकाली निधनाने देवळे पंचक्रोशीने एक आदर्श शिक्षक आणि मार्गदर्शक गमावला असून परिसरात दुःखाचा डोंगर पसरला आहे.

