(रत्नागिरी)
शहरातील लाला कॉम्प्लेक्ससमोरील रस्त्यावर भरधाव कारने दुचाकीस्वार महिलेला जोरदार धडक देऊन चिरडल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. १८) सायंकाळी घडली होती. या अपघातात सुनिता राजेश साळवी (वय ५८, रा. हिंदू कॉलनी, रत्नागिरी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलिसांनी कारचालकावर गुन्हा दाखल करून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मृत सुनिता साळवी या सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास दुचाकी (एमएच-०८ एयू-६६३३) वरून लाला कॉम्प्लेक्स परिसरातून जात होत्या. त्यावेळी अखिल पटेल (रा. उद्यमनगर, रत्नागिरी) याने आपल्या ताब्यातील कार (एमएच-०३ झेड-५६६२) अतिवेगात चालवत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे साळवी रस्त्यावर कोसळल्या आणि कार त्यांच्या अंगावरून गेली.
अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. गंभीर जखमी झालेल्या सुनिता साळवी यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुमारे अर्धा तास कसोशीने उपचार करून त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विवेक पाटील पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करून सोमवारी संशयित चालक अखिल पटेल याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. भारतीय दंड विधान संहिता कलम 106 (1)(2), 125 अ, 125 ब, 281 तसेच मोटार वाहन कायदा कलम 134/187 आणि 184 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
या “हिट एंड रन” अपघातामुळे रत्नागिरी शहरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

