(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथे आज सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास भीषण रस्ता अपघात घडला. पुण्याहून कुणकेश्वरकडे जात असलेली क्रेटा कार (MH14 ML-9618) रायपाटण टक्केवाडी भागात आली असताना मागून येणाऱ्या दुचाकीने तिला धडक दिली. ही क्रेटा कार तेजस शेलार (राहणार पिंपळे सौदागर, पुणे) चालवत होते.
दुचाकी कुणाल धावडे (रा. पाचल गुरववाडी) चालवत होता. बाईक स्वार पाचलहून वृद्धेला कोलवनखडी येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून सौंदळला सोडायला चालला होता. यावेळी अपघातानंतर दुचाकीवर (गाडी नंबर 7795) मागे बसलेल्या पार्वती ताणू तरळ (वय 75, रा. शिवणे बुद्रुक) या रस्त्यावर पडल्या. त्याच वेळी रत्नागिरीहून पाचलकडे जाणारा मालवाहू ट्रक (MH08 AQ-7266) चालक संतोष सिद्धार्थ सावंत यांच्या वाहनाच्या मागील चाकाखाली येऊन त्या चिरडल्या गेल्या. या अपघातात पार्वती तरळ यांचा जागीच मृत्यू झाला.
क्रेटा कारमध्ये एकूण पाच लहान मुली आणि चार प्रौढ प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कमलाकर पाटील, पोलीस कॉन्स्टेबल निलेश कात्रे व रामदास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. खराब रस्ता असल्यामुळे येथे कायम अपघात होतात, अशी चर्चा घटनास्थळी होती.
बाईकस्वार पाचलहून मयत वृद्धला कोलवनखडी येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून सौंदळ ला सोडायला चालला होता. क्रेटा गाडीच्या ड्राइव्हर ने अचानक ब्रेक दाबल्याने माझ्या दुचाकीने त्यांना टक्कर दिली, अशी माहिती बाईकस्वार कुणाल धावडे याने दिली.
या वेळी परिसरातील ग्रामस्थांसह रायपाटण टक्केवाडीच्या पोलीस पाटील मृण्मयी रवींद्र पांचाळ तसेच गांगणवाडीचे पोलीस पाटील स्वप्नील गांगण उपस्थित होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

