(देवळे / प्रकाश चाळके)
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातून जड वाहनांची वाहतूक अनेक महिन्यांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे रस्ता खचल्याने आणि घाटातील एका बाजूचा भाग कोसळल्याने जड वाहनांसाठी या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे व्यापारी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. साखरपा येथे आयोजित नागरिकांच्या समस्या निवारण सभेत आमदार किरण सामंत यांनी आंबा घाट जड वाहनांसाठी तातडीने खुला करण्याची मागणी केली. घटस्थापनेच्या मुहूर्तावर हा मार्ग सुरू करण्याच्या त्यांच्या सूचनेनंतर अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे.
अतिवृष्टीचा मोठा फटका आंबा घाटातील रस्त्याला बसला होता. पावसामुळे रस्ता खचला आणि एका बाजूचा भाग कोसळल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने जड वाहनांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्बंधांमुळे रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरून वाहतूक करणाऱ्या व्यापारी वर्गाची मोठी गैरसोय होत होती. मालाची वाहतूक आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावर जड वाहनांना प्रवेश बंद असल्याने व्यापाऱ्यांकडून घाट पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जात होती.
पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आणि उन्हाळा सुरू झाल्याने घाटातील रस्ता कोसळण्याचा धोका कमी झाल्याचे नमूद करत जड वाहनांसाठी वाहतूक सुरू करण्याची मागणी सभेत करण्यात आली. व्यापारी वर्गाच्या अडचणी लक्षात घेऊन आमदार किरण सामंत यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आंबा घाटातील रस्ता घटस्थापनेच्या मुहूर्तावर जड वाहनांसाठी खुला करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी, रस्ता तातडीने सुरू न झाल्यास स्वतः येऊन आंबा घाट खुला करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
आमदार किरण सामंत यांनी सभेत दिलेल्या सूचनेनंतर आंबा घाट जड वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून बंद असलेला हा मार्ग पुन्हा सुरू झाल्याने व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला आहे. आमदार भैय्या सामंत यांनी दिलेला शब्द पाळल्याची भावना व्यक्त करत जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले. आंबा घाटातील वाहतूक पूर्ववत झाल्याने रत्नागिरी आणि कोल्हापूरदरम्यान जड वाहनांची वाहतूक करणाऱ्यांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.


