(राजापूर)
राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथील डुंगेरी जेटी परिसरात दारूच्या नशेत बोटीवरून खाडीच्या पाण्यात पडलेल्या एका तरुण खलाशाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मदन हवल्दार चौधरी (वय २३, मूळ रा. नेपाळ, सध्या रा. साखरीनाटे, नजफनगर) असे मृत खलाशाचे नाव आहे.
नाटे पोलीस स्थानकाने दिलेल्या माहितीनुसार, मदन चौधरी हा मोहसिन अब्दुल्ला कोतवडकर यांच्या मासेमारी बोटीवर खलाशी म्हणून कार्यरत होता. शुक्रवार, दि. १६ रोजी तो दारूच्या नशेत बोटीवर कामासाठी आला होता. रात्री इतर सर्व खलाशी झोपलेले असताना मदन उशिरापर्यंत बोटीवर बसून दारू पित होता.
दारूच्या नशेत त्याचा तोल जाऊन तो थेट खाडीच्या पाण्यात पडला. ही बाब लक्षात येताच सहकारी खलाशांनी तात्काळ पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सापडू शकला नाही. त्यानंतर त्याचा शोध सुरू ठेवण्यात आला होता.
दरम्यान, रविवार दि. १८ रोजी जैतापूर खाडीतील नाटे डुंगेरी परिसरात पाण्यात मदन चौधरी याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नाटे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या प्रकरणी बोटीचे मालक मोहसिन कोतवडकर यांनी नाटे पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. पुढील तपास नाटे पोलीस करत आहेत.

