(पुणे)
कारमधून प्रवास करत असलेल्या डॉक्टरांचे अपहरण करून 19 लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि ऊरुळी कांचन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात चौघांना अटक करण्यात आली असून, अपहरणासाठी वापरलेली कार आणि खंडणीतील रक्कम असा एकूण 15 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टरांचा स्वतःचा ड्रायव्हरच या अपहरणाचा मुख्य साथीदार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे राजेंद्र छगन राजगुरु (वय 32, रा. अनंतपूर, पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), संतोष सोमनाथ बनकर (वय 36, रा. अनंतपूर, पैठण), दत्ता ऊर्फ गोटू बाळु आहेर (वय 34, रा. अनंतपूर, पैठण) आणि सुनील ऊर्फ सोनू मुरलीधर मगर (वय 30, रा. गणेशनगर, गारखेडा परिसर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी आहेत. आरोपी सुनील मगर याच्यावर यापूर्वी मालमत्ता चोरीचे तीन गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुंजीरवाडी येथील 58 वर्षीय डॉक्टर 10 जानेवारी रोजी रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर–पुणे महामार्गावरून ऊरुळी कांचनकडून कुंजीरवाडीकडे कारमधून जात होते. त्यावेळी राजेंद्र राजगुरु हा कार चालवत होता. इनामदार वस्ती परिसरात आरोपींनी पांढऱ्या रंगाची एरटीगा कार आडवी लावून डॉक्टरांची कार थांबवली. त्यानंतर चौघेही आरोपी डॉक्टरांच्या कारमध्ये बसले आणि चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.
डॉक्टरांचे अपहरण करून आरोपींनी त्यांना ऊरुळी कांचनमार्गे शिंदवणेच्या दिशेने नेले. या दरम्यान डॉक्टरांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. आरोपींनी चार लाख रुपयांची खंडणी घेतल्यानंतर डॉक्टरांना चौफुला येथे सोडले आणि आणखी 15 लाख रुपयांची मागणी केली. भीतीपोटी डॉक्टरांनी 12 जानेवारी रोजी 15 लाख रुपये दिले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि ऊरुळी कांचन पोलिसांची दोन विशेष पथके तयार करण्यात आली. तपासादरम्यान डॉक्टरांच्या ड्रायव्हरवर संशय बळावला. कॉल डिटेल्सच्या तपासात तो अपहरणकर्त्यांच्या सतत संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने अपहरण आणि खंडणीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी उर्वरित तिघांना अटक केली आहे. आरोपी मोलमजुरी करणारे असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एरटीगा कार आणि खंडणीतील 7 लाख 80 हजार रुपये असा एकूण 15 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजीगरे करीत आहेत.

