(रत्नागिरी / सिंधुदुर्ग)
महावितरणकडून घरगुती वीजग्राहकांसाठी बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट टीओडी (Time of Day) मीटरमुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 1 लाख 45 हजार 404 वीजग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. जुलै ते डिसेंबर 2025 या सहा महिन्यांच्या कालावधीत या ग्राहकांना एकूण 91 लाख 48 हजार रुपयांची वीजदर सवलत देण्यात आली आहे.
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरानुसार, 1 जुलै 2025 पासून घरगुती ग्राहकांसाठी टीओडी प्रणाली लागू करण्यात आली आहे. याअंतर्गत सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीत वापरल्या जाणाऱ्या विजेसाठी प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत देण्यात येत आहे. महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे पूर्णपणे मोफत बसविण्यात येत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील लाभ
रत्नागिरी जिल्ह्यात जुलै महिन्यात 48,481 ग्राहकांना 3.20 लाख, ऑगस्टमध्ये 91,360 ग्राहकांना 11.81 लाख, सप्टेंबरमध्ये 1,10,135 ग्राहकांना 15.46 लाख, ऑक्टोबरमध्ये 1,01,531 ग्राहकांना 12.29 लाख, नोव्हेंबरमध्ये 1,04,122 ग्राहकांना 13.27 लाख आणि डिसेंबरमध्ये 1,05,775 ग्राहकांना 11.35 लाख रुपयांची सवलत मिळाली. सहा महिन्यांत रत्नागिरीतील ग्राहकांना एकूण 67.41 लाख रुपयांचा लाभ झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाभ
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जुलै महिन्यात 12,125 ग्राहकांना 67 हजार, ऑगस्टमध्ये 31,772 ग्राहकांना 3.97 लाख, सप्टेंबरमध्ये 36,938 ग्राहकांना 5.48 लाख, ऑक्टोबरमध्ये 36,007 ग्राहकांना 4.41 लाख, नोव्हेंबरमध्ये 37,790 ग्राहकांना 4.91 लाख आणि डिसेंबरमध्ये 39,629 ग्राहकांना 4.60 लाख रुपयांची सवलत देण्यात आली आहे. सहा महिन्यांत सिंधुदुर्गातील ग्राहकांना एकूण 24.07 लाख रुपयांचा लाभ झाला आहे.
स्मार्ट टीओडी मीटरचे फायदे
स्मार्ट टीओडी मीटरमुळे मासिक वीज रीडिंग स्वयंचलित होते. कोणताही मानवी हस्तक्षेप नसल्याने अचूक व पारदर्शक वीजबिले मिळतात. तसेच दर तासाला होणारा वीज वापर ग्राहकांना मोबाईल अॅपवर पाहता येतो, त्यामुळे वीज वापरावर थेट नियंत्रण ठेवता येते.
टीओडी प्रणालीनुसार वीज वापराच्या वेळेनुसार दर आकारणी केली जाते. औद्योगिक क्षेत्रानंतर प्रथमच घरगुती ग्राहकांसाठी स्वस्त वीजदरासाठी ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वॉशिंग मशीन, गिझर, इस्त्री, एअर कंडिशनर यांसारखी जास्त वीज वापरणारी उपकरणे वापरल्यास ग्राहकांना अधिक सवलत मिळू शकते.
पुढील पाच वर्षांची सवलत संरचना
आयोगाने 2025 ते 2030 या कालावधीत घरगुती ग्राहकांसाठी टीओडी सवलत निश्चित केली आहे. जुलै 2025 ते मार्च 2026 या कालावधीत प्रतियुनिट 80 पैसे, 2027 मध्ये 85 पैसे, 2028 व 2029 मध्ये 90 पैसे आणि 2030 मध्ये 1 रुपया प्रतियुनिट सवलत मिळणार आहे.
महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे की स्मार्ट टीओडी मीटर हे प्रीपेड नसून पोस्टपेडच आहेत. म्हणजेच सध्याप्रमाणे आधी वीज वापर आणि नंतर मासिक बिल भरण्याची पद्धत कायम राहणार आहे. तसेच या मीटरसाठी ग्राहकांवर कोणताही आर्थिक भार टाकण्यात येणार नाही.

