बदलती जीवनशैली आणि वाढता मानसिक तणाव यामुळे सध्या हृदयरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अनेकांना वेळीच निदान न झाल्यामुळे जीव गमवावा लागत आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक आणि आशादायक बातमी समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील मूळ भारतीय असलेल्या १४ वर्षीय सिद्धार्थ नंदयाल या मुलाने केवळ ७ सेकंदांत हृदयरोग ओळखू शकणारे एआय अॅप विकसित केले आहे. ‘सर्केडियन एआय’ (Circadian AI) नावाचे हे अॅप स्मार्टफोनद्वारे हृदयाचे ठोके ऐकून संबंधित आजारांची ओळख करून देते — आणि तेही ९६ टक्क्यांहून अधिक अचूकतेने. या अद्वितीय शोधामुळे सिद्धार्थचे सर्वत्र कौतुक होत आहे. अमेरिकेत १५,००० हून अधिक आणि भारतातील ७०० रुग्णांवर या अॅपची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
सिद्धार्थ सध्या अमेरिकेत वास्तव्यास असून, त्याचे वडील महेश यांचे मूळ गाव अनंतपूर (आंध्र प्रदेश) आहे. महेश यांनी २०१० साली अमेरिकेत स्थलांतर केले होते. विशेष म्हणजे, सिद्धार्थ केवळ संशोधकच नाही तर तो STEM IT या संस्थेचा संस्थापक व सीईओ देखील आहे. ही संस्था जगभरातील विद्यार्थ्यांना कोडिंग, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या विषयांमध्ये प्रशिक्षण देण्याचे काम करते. सिद्धार्थचे उद्दिष्ट एक अॅप तयार करण्यापुरते मर्यादित नाही. तो म्हणतो, “जगभरातील प्रत्येक मुलाला तंत्रज्ञानाची खरी ताकद ओळखता आली पाहिजे आणि ते योग्य पद्धतीने वापरता आले पाहिजे.” त्यामुळेच तो आपल्या समवयस्क विद्यार्थ्यांना सतत नवीन शिकण्यासाठी प्रेरित करत असतो.