(संगमेश्वर / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक येथे फलाट क्रमांक १ आणि २ वर कोच पोजिशन डिजिटल इंडिकेटर बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत कोकण रेल्वे चे व्यवस्थापकीय संचालक (CMD) यांना बेलापूर येथे निवेदन सादर करण्यात आले.
“निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर” या फेसबुक ग्रुपच्या वतीने हे निवेदन देण्यात आले असून, स्थानकावर प्रवाशांना भेडसावणाऱ्या वाढत्या गैरसोयींचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला आहे. संगमेश्वर रोड हे कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असून, येथे दररोज मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. मुंबई, गोवा, कर्नाटक तसेच इतर राज्यांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हे स्थानक अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
मात्र, या स्थानकावर कोच पोजिशन दर्शविणारे डिजिटल इंडिकेटर उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना गाडी येण्यापूर्वी त्यांच्या आरक्षित डब्याची अचूक माहिती मिळत नाही. परिणामी गाडी थांबताच प्रवाशांची धावपळ उडते आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व्यक्ती आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्यांना या परिस्थितीचा अधिक फटका बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेकदा योग्य डब्यापर्यंत वेळेत पोहोचता न आल्याने अपघाताचा धोका देखील वाढत आहे.
इतर अनेक स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध असताना संगमेश्वर रोड स्थानकावरही ती तातडीने सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयी-सुविधा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी व्यक्त केली.

