(देवरुख / सुरेश सप्रे)
अभिरुची देवरुख आयोजित “स्वरोत्सव” या वार्षिक संगीत महोत्सवाची सुरुवात देवरुख येथील पित्रे प्रायोगिक कलामंच येथे ग्वाल्हेर, पतियाळा तसेच किराणा घराण्याची गायकी आत्मसात केलेले सुप्रसिद्ध गायक पं. व्यंकटेश कुमार यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने झाली.
कोकणगंधर्व स्वराधिराज राजाभाऊ शेंबेकर यांच्या हस्ते कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. दिप प्रज्वलन व नटराज पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी आर्ट सर्कल चे माजी अध्यक्ष जयंत प्रभुदेसाई, प्रमुख प्रायोजक सुमधूर मेवा प्रॉडक्ट्स ची उदय भिडे, संदीप गानू. शर्दूल गानू, वनाझ इंजीनियर्सचे विलास पुरोहित यशोदीप कयाळ, आदी मान्यवर उपस्थित होते
पंडितजींची चतुरस्त्र आणि दमदार गायकी, तबला आणि हार्मोनियम ची उत्कृष्ट संगत, रासिकांचा उत्तम प्रतिसाद यामुळे स्वरोत्सव २०२६ ची दमदार सुरुवात झाली. या मैफिलीत देवरुखसह साखरपा, संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण, देवगड, सावंतवाडी येथील रसिकांनी संगीत मैफिलीचा आस्वाद घेतला. तबला साथीला प्रशांत पांडव तर हार्मोनियम साथीदार सुयोग कुंडलकर यांनी उत्तम साथ केली.
अभिरुची तर्फे सर्वांचे स्वागत आणि कलाकार परिचय महेश उर्फ अप्पा आठल्ये व मंगेश प्रभुदेसाई यांनी केले. कोकणगंधर्व स्वराधिराज राजाभाऊ शेंबेकर यांच्या हस्ते पंडित व्यंकटेश सुमार यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला
स्वरोत्सवाच्या या कार्यक्रमासाठी विशेष सहाय्य करणारे गोविंदराव बेडेकर तसेच प्रमुख प्रायोजक म्हणून सुमधूर मेवा प्रॉडक्ट्स चे उदय भिडे यांचा सन्मान अभिरुची चे अध्यक्ष आशिष प्रभुदेसाई यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.
आज शनिवार दि. १० जानेवारी २०२६ रोजी पं. विद्युत मिश्रा यांचे पट्ट शिष्य असलेले सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक मनास कुमार यांच्या व्हायोलिन वादनाची मैफल सादर होणार आहे. त्याला तनय रेगे हे तबला साथ करणार आहे. या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहून रसिकांनी स्वरोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन अभिरुची तर्फे करण्यात येत आहे.

