(रत्नागिरी)
महिलांच्या आरोग्यसेवेला बळ देण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड (MGL) यांच्या “एमजीएल आरोग्य प्रोग्राम” या सीएसआर उपक्रमांतर्गत महिलांसाठी गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची मोफत HPV DNA तपासणी व जनजागृती कार्यक्रम रा. ए. सोसायटीच्या रा. भा. शिर्के हायस्कूल, रत्नागिरी येथे ८ जानेवारी रोजी यशस्वीरित्या पार पडला.
हा कार्यक्रम मालती-जनार्दन फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांनी त्यांच्या इनक्यूबेटी कंपनी आयुजेन बायोसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांसाठी हा गर्भाशयमुख कर्करोग जागरूकता व तपासणी उपक्रम राबविला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या, मात्र टाळता येण्याजोग्या गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे लवकर निदान आणि प्रतिबंध याबाबत जनजागृती करणे हा होता.
३० वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या महिलांची HPV DNA चाचणी या ठिकाणी करण्यात आली. साधारणपणे सुमारे ३,००० रुपये खर्चिक असणारी ही तपासणी महिलांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महानगर गॅस लिमिटेडच्या सीएसआर व्यवस्थापक श्रीमती दीपिका शिवकुमार होत्या. प्रमुख पाहुण्यांमध्ये रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, नगराध्यक्षा श्रीमती शिल्पा सुर्वे, जी. जी. पी. एस. इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली पाटणकर, रा. भा. शिर्के हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. के. डी. कांबळे, आयुजेन बायोसायन्सेसचे संचालक श्री. मनीष पुंगलिया, विपणन व्यवस्थापक श्री. अभय वैद्य यांच्यासह कॅम्प आयोजक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या आरोग्य शिबिराला सुमारे २२५ महिलांनी उपस्थिती लावली असून कार्यक्रमाला महिलांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यावेळी श्रीमती दीपिका शिवकुमार यांनी एमजीएल आरोग्य कार्यक्रम तसेच रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या इतर सीएसआर उपक्रमांची माहिती दिली.
तज्ज्ञ डॉक्टरांनी माहिती देताना सांगितले की, भारतातील महिलांमध्ये होणाऱ्या कर्करोगांमध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर असून ३० ते ६० वयोगटातील महिलांमध्ये त्याचे प्रमाण अधिक आढळते. ग्रामीण भागात या आजाराचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. दरवर्षी भारतात सुमारे १ लाख ३० हजार नवीन रुग्ण आणि ७४ हजार मृत्यू या आजारामुळे होत असल्याचे आकडेवारी सांगते.
सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे दिसून येत नसल्याने स्क्रीनिंगद्वारे लवकर निदान करणे अत्यंत आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला महानगर गॅस लिमिटेडचे सीएसआर मॅनेजर श्री. सुसांता राऊत तसेच सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या श्रीमती सोनाली भट्टाचार्या, (प्रकल्प संचालिका – एमजीएल आरोग्य) यांचेही मार्गदर्शन लाभले.

