( राजापूर )
राजापूर शहरात गेल्या काही वर्षांपासून अनधिकृत बांधकामांचा मुद्दा चर्चेत होता. अखेर मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर नगर पालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून आज सकाळी शिवाजी पथ रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने थेट हटवण्यात आले.
या कारवाईद्वारे शहरातील अनधिकृत बांधकामांवर पुढील काळात आणखी कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पालिकेने दिला आहे. कारवाईदरम्यान कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलीस दलातर्फे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शहरातील बाजारपेठ आणि इतर भागांतील अनधिकृत बांधकामांबाबत नागरिकांकडून सातत्याने कारवाईची मागणी होत होती. मात्र, यापूर्वी अपेक्षित कारवाई होताना दिसत नव्हती. मात्र आजच्या धडक कारवाईमुळे वर्षानुवर्षे उभ्या असलेल्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेने स्पष्ट संदेश दिला असून, शहरातील नियोजन व शिस्त राखण्यासाठी ही मोहीम पुढे अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

