(जाकादेवी /संतोष पवार)
शिक्षणाचे मोल शिका. दारिद्रय हे परिस्थितीचे नसून मन:स्थितीचे असते.शालेय जीवन आयुष्याचा सूर शोधण्याचा काळ आहे. सूर लागणे म्हणजे कर्तृत्वाची समाधी होय. विद्यार्थी हे जीवनाचे उत्तम खेळाडू आहेत. देशाच्या प्रगतीसाठी देशाला सर्वोत्तम सुजाण तरुण-तरुणींची गरज आहे. आजच्या पिढीमध्ये ज्ञानाची जबरदस्त तहान आहे. मेंदूचा, बुद्धीचा विकास प्रचंड आहे, पण हृदय भकास होता कामा नये. यासाठी विद्यार्थ्यांनी विवेकाची ज्योत अंतरी तेवत ठेवली पाहिजे. आजच्या पिढीची अफाट ज्ञानाची तहान भागवणारे मार्गदर्शक महत्त्वाचे असून मार्गदर्शन कमी पडता कामा नये, आजच्या पिढीला चैतन्यमय चेहऱ्याचा शिक्षक हवा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ कवी, विचारवंत प्रवीण दवणे यांनी केले.
जाकादेवी येथे तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराव पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित व्याख्यान “जो गतीत तो प्रगतीत..” या शीर्षकाखाली झालेल्या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. विखुरलेला माणूस प्रगती साधू शकत नाही. आजची पिढी मोबाईलकडे आकर्षित झाली आहे. विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे मोल शिकले पाहिजे.अपयश आले तरी जिंकण्याची तीव्र इच्छा मनी ठेवली पाहिजे. स्वप्न सत्यात उतरवा. तुम्हीच तुमचे उपदेशक बनले पाहिजे.वेळ कुणासाठी थांबत नाही, एकदा आलेली संधी गेली की, आयुष्याचा संधिवात व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांबरोबर जगणे शिकता आले पाहिजे. रस्ता चुकत आहे लक्षात येताच योग्य वेळी यु टर्न घेता आला, तरच जीवन गती आणि प्रगती साधेल. दारिद्रय परिस्थितीचे नसून मनस्थितीचे असते. आयुष्य जगताना विवेकाची ज्योत कायम अंतरी जपली पाहिजे,असे प्रेरणादायी विचार प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले.
यावेळी त्यांनी भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा यावर भाष्य करताना विद्यार्थी संस्कारावर लक्ष केंद्रित केले. अनेक साहित्यिकांच्या निवडक काव्यांचा आधार घेत विद्यार्थी -शिक्षक यांचे व्याख्यानातून प्रबोधन घडवून आणले. ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांचा शाळा व संस्थेतर्फे संस्थेचे ट्रस्टी डॉ.सुभाष आखाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदरचा कार्यक्रम मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. सुभाष आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक नितीन मोरे यांनी केले. सूत्रसंचलन व साहित्यिकांचा परिचय सहाय्यक शिक्षक वैभव खानोलकर यांनी करून दिला. आभार अरूण कांबळे यांनी मानले.
यावेळी सौ. दवणे,विष्णुपंत निमकर,सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार, केशव राठोड, संतोष सनगरे, सौ.सायली राजवाडकर, अमित बोले, मंदार रसाळ यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हा स्तुत्य कार्यक्रम मालगुंड एज्युकेशन सोसायटीने घडवून आणला होता.
फोटो -ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे यांच्या समवेत सौ.दवणे, डॉ.सुभाष आखाडे, श्री.निमकर, मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग.
(छाया -संतोष पवार,जाकादेवी)

