(देवरूख)
सांगली येथील कलाविश्व महाविद्यालयात आयोजित मल्टीस्टेट रांगोळी स्पर्धेत देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
कलाविश्व महाविद्यालय, सांगली येथील लोकरंग भूमी शांतिनिकेतन यांच्या वतीने स्व. प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रासह विविध राज्यांतील ४६ नामवंत कलाकारांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
स्पर्धेचा विषय वनस्पती व प्राणीशास्त्रावर आधारित दृश्यप्रतिमा (वाइल्ड फोटोग्राफी) असा होता. या आव्हानात्मक विषयावर विलास रहाटे यांनी ४ फूट x ६ फूट आकाराची रांगोळी तब्बल २२ तासांत साकारली. शिकार केलेल्या चित्त्याची प्रतिमा, पाणवठ्यावर पाणी पित असलेली मादी चित्ता आणि तिची दोन बछडे अशी अत्यंत जिवंत मांडणी त्यांनी रांगोळीतून उभी केली.
या रांगोळीला दिलेली “जंगल सुरक्षित आहे, कारण चित्ता सजग आहे” ही टॅगलाईन परीक्षक आणि प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेणारी ठरली. उत्कृष्ट कलाकृतीसाठी आयोजकांच्या वतीने विलास रहाटे यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
दरम्यान, श्री सत्य साई जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्री सत्यसाई सेवा समिती रत्नागिरी यांच्या वतीने रंजन हॉल, शिर्के हायस्कूल, रत्नागिरी येथे आयोजित रांगोळी स्पर्धेतही विलास रहाटे यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे.
या स्पर्धेत त्यांनी “दानधर्म/मदत हाच खरा धर्म” या विषयावर छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांच्या रयतेसाठीच्या सेवाभावी कार्याचे प्रभावी चित्रण केले. “दानधर्म हा धर्म आणि रयतेची सेवा हेच राजकारण” ही टॅगलाईन विशेष चर्चेचा विषय ठरली. रांगोळी क्षेत्रातील सातत्यपूर्ण यश आणि सामाजिक आशय असलेल्या कलाकृतीमुळे विलास रहाटे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
(छायाचित्र: आदित्य कुंभार)

