(मुंबई)
राज्य निवडणूक आयोगाने अखेर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ११ नोव्हेंबर रोजी मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. प्रत्येक वॉर्डसाठी एक नगरसेवक अशी एकसदस्यीय प्रभाग पद्धती लागू राहील, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. याआधी २७ ऑक्टोबर रोजी राज्यातील २८ महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. मात्र, मुंबई महापालिकेचा कार्यक्रम प्रलंबित होता.
बुधवारी सायंकाळी आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला असून, राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुंबईसह राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करणे बंधनकारक आहे.
आरक्षणाचा तपशील
२२७ जागांपैकी अनुसूचित जातींसाठी १५, अनुसूचित जमातींसाठी २ आणि इतर मागासवर्गीयांसाठी ६१ जागा आरक्षित असतील. तसेच, एकूण जागांपैकी ५० टक्के म्हणजेच ११४ जागा महिलांसाठी राखीव असतील. आरक्षण सोडत झाल्यानंतर हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेऊन अंतिम आरक्षण निश्चित करण्यात येईल. त्यानंतर निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार असून, मुंबई महापालिकेत कोणता पक्ष किल्ला जिंकतो हे स्पष्ट होणार आहे.
मुंबई महापालिका आरक्षण सोडतीचा कार्यक्रम
- ३० ऑक्टोबर–३ नोव्हेंबर: आरक्षित जागांची संख्या निश्चित करून आयोगाची मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर करणे.
- ६ नोव्हेंबर: आरक्षण सोडतीची जाहीर सूचना वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करणे.
- ११ नोव्हेंबर: प्रत्यक्ष आरक्षण सोडत काढणे आणि निकाल आयोगास सादर करणे.
- १४ नोव्हेंबर: प्रारूप आरक्षण प्रसिद्ध करून हरकती आणि सूचना मागविणे.
- २० नोव्हेंबरपर्यंत: हरकती आणि सूचना स्वीकारणे.
- २१–२७ नोव्हेंबर: महापालिका आयुक्तांकडून हरकती व सूचनांवर सुनावणी व निर्णय.
- २८ नोव्हेंबर: अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिद्ध करणे.

