(राजापूर/ रत्नागिरी)
राजापूर तालुक्यातील तळवडे येथील बाळकृष्ण यशवंत पराडकर (वय ६२) यांचे मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.२० वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळकृष्ण पराडकर यांना मागील वर्षभरापासून पोटातील अल्सर, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. त्यासाठी त्यांच्यावर औषधोपचार सुरू होते. २५ सप्टेंबर रोजी घरी असताना त्यांना अचानक रक्ताची उलटी झाली. त्यानंतर आई आणि बहीण तन्वी यांनी त्यांना प्राथमिक उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर एंडोस्कोपी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. मात्र, पुढील उपचारांसाठी कोल्हापूर किंवा मुंबई येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार, २७ सप्टेंबर रोजी पराडकर यांना मुंबईतील भायखळा येथील सर जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. २ ऑक्टोबर रोजी त्यांची एंडोस्कोपी करण्यात आली. प्रकृतीत सुधारणा झाल्याने तसेच सीटी स्कॅन आणि सोनोग्राफीसाठी आठवड्यानंतर पुन्हा येण्याच्या सूचनेसह ४ ऑक्टोबर रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
त्यानंतर त्यांना डोंबिवली येथे नेण्यात आले. दरम्यान, ७ ऑक्टोबर रोजी पुन्हा रक्ताची उलटी झाल्याने पराडकर यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान ८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.२० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची नोंद सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली होती. संबंधित कागदपत्रे राजापूर पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात आल्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी पहाटे ३.०१ वाजता राजापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यू रजिस्टर क्रमांक ६२/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली. या प्रकरणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १९४ अन्वये कार्यवाही करण्यात येत आहे.


