(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुका संयुक्त कार्यक्रम समितीच्या वतीने भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव तथा भारतीय संविधान दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा ( सिव्हिल हॉस्पिटल शेजारी ) व थिबा राजा कालीन बुद्ध विहार रत्नागिरी (डी.एस.पी. बंगल्यानजीक) येथे भारतीय संविधानाची उद्देशिका वाचून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आयु. प्रकाश रामचंद्र पवार व विजय मोहिते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्वलित करण्यात आले. याचवेळी त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले व भारतीय संविधान उद्देशिका वाचन करण्यात आली.
त्यानंतर रत्नागिरी डी.एस.पी. बंगला नजीकच असलेल्या थिबा राजा कालीन बुद्ध विहार येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आली. यावेळी भारतीय संविधान या विषयावर जेष्ठ विचारवंत, आंबेडकरी चळवळीतील सेवाभावी कार्यकर्ते सेवानिवृत्त तहसीलदार विजय जाधव, प्रकाश पवार, विजय मोहिते यांनी भारतीय संविधान, लोकशाही गणराज्य, आपले मूलभूत अधिकार व कर्तव्ये अशा विविध अंगी पैलूंवर विशेष मार्गदर्शन करुन भारतीय संविधानाचा गौरव केला. भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी, उद्देशिका आचरणात आणण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. भारतीय संविधान व उद्देशिका आचरणात आणण्यासाठी सर्व भारतीय नागरिकांनी निर्धार करुया असं आवाहन ही मान्यवर पदाधिकारी यांनी यावेळी केले.
सदर कार्यक्रम हा सालाबाद प्रमाणे यंदाही बौद्धजन पंचायत समिती रत्नागिरी तालुका, भारतीय बौद्ध महासभा सभा तालुका रत्नागिरी, भिम युवा पँथर रत्नागिरी यांच्यातर्फे संयुक्त कार्यक्रम समितीच्या वतीने करण्यात आला.
याप्रसंगी संयुक्त कार्यक्रम समितीचे अध्यक्ष आयु.विजय मोहिते, सेक्रेटरी मंगेश सावंत, थिबा राजा कालीन बुद्ध विहार विकास चॅरिटेबल ट्रस्टचे उपक्रमशील अध्यक्ष आयु.प्रकाश पवार, उपाध्यक्ष भगवान जाधव, कोषाध्यक्ष प्रितम आयरे, विजय जाधव, सल्लागार वकील शिवराज जाधव, सुहास कांबळे, राहुल पवार,दिपक जाधव, गौतम सावंत, रविकांत पवार, समिर जाधव यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बौद्धजन पंचायत समितीचे सेक्रेटरी सुहास कांबळे यांनी केले, तर आभार संयुक्त समितीचे सेक्रेटरी मंगेश सावंत यांनी मानले.

