(पुणे)
“ओम नमस्ते गणपतये, ओम गं गणपतये नमः, मोरया… मोरया…” अशा गजरात आज (गुरुवार) पहाटे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर भक्तिरस ओसंडून वाहला. तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येऊन सामूहिक अथर्वशीर्ष पठण करून गणरायाला वंदन केलं.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे दरवर्षी आयोजित होणाऱ्या या उपक्रमाचे यंदा ४० वे वर्ष होते. गणेशोत्सवाच्या १३३ व्या वर्षानिमित्त महिलांनी मध्यरात्रीपासूनच मंडपाजवळ जमायला सुरुवात केली. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या या महिलांनी शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात केली आणि त्यानंतर गणेश जागर गीत, ओंकार जप तसेच मुख्य अथर्वशीर्ष पठणात सामील होत गणरायाला नमन केले.
संपूर्ण मंडपापासून मंदिर परिसरापर्यंत महिलांचा उत्साह डोळ्यात भरावा असा होता. प्रत्येक ओव्या, प्रत्येक जपामध्ये गणेशभक्तीचा दरवळ जाणवत होता. कार्यक्रमाची सांगता महाआरतीने झाली आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात वातावरण भक्तिभावाने दुमदुमून गेलं. या वेळी खासदार सुनेत्रा पवार यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

