(चिपळूण)
शहरातील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय इमारतीत असलेल्या नगर परिषदेच्या हनुमान व्यायामशाळेला नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी व्यायाम करणाऱ्या तरुणांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. व्यायामासाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रसामग्री नगर परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
याच भेटीदरम्यान नगराध्यक्ष सकपाळ यांनी एक महत्त्वाची घोषणा करत, आतापर्यंत आकारली जाणारी दरमहा २०० रुपयांची फी पूर्णपणे रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर केले. यापुढे कोणाकडूनही कोणतीही फी आकारली जाणार नसून, सर्व युवक-युवतींसाठी व्यायामशाळा पूर्णपणे विनामूल्य खुली राहणार आहे. या निर्णयाचे शहरातील तरुणांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे.
नगर परिषदेच्या या व्यायामशाळेचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले असून, आधुनिक व अद्ययावत यंत्रसामग्रीची त्यात भर घालण्यात आली आहे. नूतनीकरणानंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व्यायामशाळेचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर आता नगराध्यक्षांनी स्वतः पुढाकार घेऊन व्यायामशाळा सर्वसामान्यांसाठी अधिक सुलभ व मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे.
या प्रसंगी शिवसेनेचे पालिकेतील गटनेते अंकुश आवले, नगरसेवक कपिल शिर्के, उपशहरप्रमुख सुयोग चव्हाण, ओंकार नलावडे, निशांत जंगम यांच्यासह अनेक व्यायामपटू उपस्थित होते. या निर्णयामुळे शहरातील युवकांच्या आरोग्यवर्धनाला मोठी चालना मिळेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

