(रत्नागिरी / चिपळूण)
उत्तर रत्नागिरीतील नागरिकांना अधिक जलद, सुलभ आणि लोकाभिमुख टपाल सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्वतंत्र ‘चिपळूण डाक विभागा’चा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. या नव्या विभागामुळे चिपळूण, दापोली, खेड, गुहागर आणि मंडणगड या पाच तालुक्यांतील नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी रत्नागिरीला जाण्याची आवश्यकता राहणार नसून, बहुतांश सेवा आता चिपळूण येथूनच उपलब्ध होणार आहेत.
उद्घाटनप्रसंगी गोवा परिक्षेत्राचे पोस्टल सेवा संचालक रमेश पाटील म्हणाले, “हा नवीन विभाग जनतेच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आला आहे. आपण सर्वजण जनतेचे सेवक आहोत. त्यामुळे आपल्या सेवेत अचूकता, पारदर्शकता आणि गतिमानता असणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांना टपाल खात्याच्या सेवा अधिक सुलभ आणि दर्जेदार पद्धतीने मिळाव्यात, हीच या विभागामागील प्रमुख भूमिका आहे.”
फित कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून नव्या विभागाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोस्टल सेवा संचालक संदीप कडगावकर, रत्नागिरी डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी, नगरसेविका रसिका देवळेकर, प्रयास फाउंडेशनच्या अध्यक्षा रवीना गुजर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाच तालुक्यांचा समावेश
नव्याने स्थापन करण्यात आलेल्या चिपळूण डाक विभागात चिपळूण, दापोली, खेड, गुहागर आणि मंडणगड या उत्तर रत्नागिरीतील पाच तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून, या परिसरातील सर्व डाकघरे आता चिपळूण विभागाच्या कार्यक्षेत्रात येणार आहेत.
“माझ्या सेवाप्रवासाची सुरुवात याच भागातून”
यावेळी आपल्या कारकिर्दीच्या आठवणींना उजाळा देताना रमेश पाटील भावूक झाले. ते म्हणाले, “माझ्या सेवाप्रवासाची सुरुवात दापोली विभागातून झाली होती. त्या काळात या पाचही तालुक्यांचा कार्यभार मी एकट्याने सांभाळत होतो. ग्रामीण भागात काम करताना नागरिकांशी निर्माण झालेले नाते आजही कायम आहे. या भागातील अनेक नागरिक आजही माझ्या संपर्कात आहेत.”
नागरिकांसह कर्मचाऱ्यांनाही मोठा फायदा
यापूर्वी विविध प्रशासकीय कामे, तक्रारी किंवा कार्यालयीन बाबींसाठी नागरिकांना रत्नागिरीला जावे लागत होते. आता ही सर्व कामे चिपळूण येथेच अधिक वेगाने पूर्ण होणार आहेत. स्थानिक स्तरावर कार्यालय उपलब्ध झाल्याने तक्रारींचे निवारण जलद होईल, सेवांचा विस्तार वाढेल आणि कर्मचाऱ्यांनाही आपल्या परिसरात राहून सेवा देण्याची संधी मिळणार आहे.
उत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा गौरव
विमा संकलन तसेच नवीन आर्थिक वर्षात सर्वाधिक खाती उघडणाऱ्या उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पदक, प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक डाकघर अधीक्षक अजय कदम यांनी केले, तर दिलीप बेडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

