(संगमेश्वर /प्रतिनिधी)
सोनवडे बौद्धवाडी येथील ‘जयभिम’ स्तंभावर अज्ञात व्यक्तीने केलेल्या तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिस प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणी देवरूख पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना गुरुवारी (दि. १६) रात्री सुमारे दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याचवेळी सोनवडे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणदर्शन कार्यक्रम सुरू असल्याने बहुसंख्य ग्रामस्थ कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. या संधीचा गैरफायदा घेत समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने ‘जयभिम’ स्तंभावर तोडफोड केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सोनवडे परिसरात आजवर सर्व जाती-धर्मातील नागरिकांनी परस्पर सलोख्याने सण-उत्सव साजरे केले आहेत. सामाजिक ऐक्य आणि परस्पर आदराची परंपरा असलेल्या या भागात घडलेला हा प्रकार दुर्दैवी आणि निषेधार्ह असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. समाजातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
घटनेनंतर पोलिस प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करत परिसरात बंदोबस्त वाढवला. शुक्रवारी सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी मोठ्या पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांप्रती नागरिकांनी दाखवलेला संयम आणि शांततेचा मार्ग वाखाणण्याजोगा असल्याचे सांगितले. या बैठकीस पंचक्रोशीतील धम्म बांधव, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच, पोलिस पाटील तसेच युवक प्रतिनिधी रोहित तांबे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी एकमताने या निंदनीय प्रकाराचा निषेध करत दोषींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली.
दरम्यान, पोलिस यंत्रणेच्या देखरेखीखाली ‘जयभिम’ स्तंभाची तातडीने दुरुस्ती करण्यात आली. या स्तंभावर कोरलेले शब्द केवळ प्रतीक नसून सामाजिक समतेचा आणि मानवी मूल्यांचा संदेश देणारे असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या प्रकरणी आमदार शेखर निकम यांनीही घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. आतापर्यंत दाखवलेल्या संयमाबद्दल त्यांनी नागरिकांचे कौतुक केले तसेच दोषींवर जलद तपास करून कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस प्रशासनाला दिल्याचे सांगितले.
घटना शांततेच्या वातावरणात हाताळली जात असली तरी दोषी सापडेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी स्पष्ट केली आहे. समाजात द्वेष आणि वैरभाव पसरवणाऱ्या प्रवृत्तींचा बीमोड करून शांतता व सलोखा जपणे ही सामूहिक नैतिक जबाबदारी असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

