(रत्नागिरी / महेश्वर तेटांबे)
महाराष्ट्रातील सेवाभावी संस्थांना सक्षम करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेविका, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या डॉ. सौ. सुनीताताई मोडक यांनी नुकतीच ‘सेवाभावी संस्था प्रबोधन समिती’ स्थापन केली. या समितीचे उद्घाटन महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरी येथे पार पडले
या वेळी बोलताना उदय सामंत म्हणाले, “रत्नागिरी ही अशी पवित्र भूमी आहे की, इथे सुरू झालेलं कोणतंही कार्य अर्धवट राहत नाही. सेवाभावी संस्था जर राजकीय रंग न घेता समाजहितासाठी काम करत राहिल्या, तर समाजप्रबोधनाची मोठी ताकद त्यांच्यात आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, सेवाभावी संस्था या पक्षनिरपेक्ष राहून समाजातील गैरसमज, अन्याय आणि चुकीच्या प्रवृत्तीवर प्रकाश टाकतात. त्यामुळेच त्यांच्या कार्याचा प्रभाव अधिक ठळक होतो.
“माझं राजकारण देखील सेवाभावी संस्थेतूनच सुरू झालं. जनतेचं प्रेम आणि विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. समितीच्या कार्याला शासनस्तरावर पूर्ण सहकार्य दिलं जाईल,” अशी ग्वाही सामंत यांनी दिली.
समितीची रचना
डॉ. सुनीताताई मोडक यांच्या नेतृत्वाखाली समितीची राज्यस्तरीय रचना करण्यात आली आहे. राज्य अध्यक्षा: डॉ. सुनीताताई मोडक, प्रकोष्ठ समिती प्रमुख: सौ. शालिनीताई ठाकरे, कार्याध्यक्षा: अनिता तीपायले, सचिव: लक्ष्मण डोळस, खजिनदार: डॉ. सतीश जगताप, सहसचिव: प्रताप पवार, प्रमुख सल्लागार: भगवंत (बाळाभाऊ) फाटक, डॉ. संजय पाटील
तसेच विविध जबाबदाऱ्या राज्य संपर्क प्रमुख, रोजगार प्रमुख आणि जिल्हा-तालुका समित्यांना देण्यात आल्या आहेत.
उद्घाटन सोहळ्याला विविध पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चित्रपट दिग्दर्शक व समितीचे राज्य सदस्य शरद उगले यांनी केले.

