(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे दख्खन मोहल्ला येथे भरधाव वेगाने दुचाकी चालवणाऱ्या तरुणाला “गाडी सावकाश चालव” असे सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून ५० वर्षीय प्रौढाला ६ जणांच्या जमावाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूर्वीच्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात नवीन भारतीय न्याय संहितेनुसार ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्दुल सलाम अब्दुल सतार कापडी (वय ५०, रा. कोंडीवरे कापडी मोहल्ला) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी फैजान अब्दुल शेख, जावेद अली सय्यद, अब्दुल अली सय्यद, अलियान अब्दुल सय्यद, नय्यर असुल शेख आणि तहसिम अब्दुल सय्यद (सर्व रा. कोंडीवरे खान मोहल्ला) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फैजान शेख याच्या कथित नशेच्या सवयीवरून गेल्या दोन महिन्यांपासून अब्दुल सलाम कापडी आणि संबंधितांमध्ये वाद सुरू होता. रविवारी, ७ जून २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास कापडी हे कोंडीवरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका परिचित व्यक्तीसोबत बोलत उभे होते. त्यावेळी जावेद अली सय्यद हा दुचाकीवरून भरधाव वेगाने जात असताना कापडी यांनी त्याला “गाडी सावकाश चालव” असे सांगितले.
यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर जावेद तेथून निघून गेला. काही वेळाने अब्दुल सलाम कापडी हे दुचाकीवरून घराकडे जात असताना वाटेत फैजान शेख याने त्यांना अडवून पुन्हा वाद घातल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास इतर आरोपी घटनास्थळी जमा झाले. सर्वांनी मिळून बेकायदेशीर जमाव तयार करत कापडी यांना घेरले आणि त्यांच्या चेहऱ्यावर व तोंडावर हाताने मारहाण केली. तसेच अश्लील शिवीगाळ करत धमकावल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी अब्दुल सलाम कापडी यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सोमवारी, ८ जून २०२६ रोजी दुपारी १२.५७ वाजता संबंधित ६ जणांविरोधात मारहाण, दंगल, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला.
या घटनेचा पुढील तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.

