(संगमेश्वर / एजाज पटेल)
आज कुरधुंडा येथील जेटीवर उभं राहिलं की मन भरून येतं. कधी काळी पावलांच्या गडगडाटाने, माणसांच्या आवाजाने आणि नौकांच्या घरघराटाने जिवंत असलेली ही जेटी आज शांत, एकटी आणि ओस पडलेली आहे. पाण्यावर नजर टाकली की वाटतं, इथून कधी काळी कितीतरी आयुष्यं रोज पुढे जात होती, आणि आज इथे फक्त आठवणी उरल्या आहेत.
डिंगणी–फुणगूस खाडीवर पूल होण्यापूर्वी हा जेटी परिसर म्हणजे जीवनवाहिनी होती. फुणगूस, डिंगणी आणि आजूबाजूच्या वीस–तीस गावांतील लोकांसाठी संगमेश्वरकडे जाण्याचा तो एकमेव जलमार्ग. सकाळी अंधारातच घराबाहेर पडून जेटीवर पोहोचायचं, नौकेची वाट पाहायची, आणि मनात एकच प्रार्थना असायची की,आजचा प्रवास सुखरूप व्हावा.
नौकेत पाय ठेवताच जाणवायचा तो डोलारा. लाटांवर हेलकावणारी छोटीशी यांत्रिक नौका आणि त्यात बसलेली अनेक जीवघेणी स्वप्नं. पावसाळ्यात हा प्रवास अधिकच कठीण व्हायचा. काळ्या ढगांनी भरलेलं आकाश, वाऱ्याचा जोर, पाण्यावर आदळणाऱ्या लाटा—अशा परिस्थितीतही नौका थांबत नसे. अंगावर उडणारे पाणी, थरथरणारी मनं आणि तरीही एकमेकांना दिलासा देणारे शब्द हा संघर्ष रोजचाच होता. त्या प्रवासात भीती होती, पण त्यासोबतच अपरिहार्यता होती.
शाळकरी मुलांना शिक्षणासाठी, रुग्णांना उपचारासाठी, नोकरदारांना नोकरीसाठी आणि शेतकऱ्यांना बाजारासाठी हा जीवघेणा प्रवास करावाच लागायचा. कधी नौका उशिरा लागायची, कधी पावसामुळे थांबावं लागायचं, तर कधी प्रवासात अडचणी यायच्या. पण तरीही जेटीवर उभे राहून वाट पाहणारे चेहरे कधी कमी झाले नाहीत.
आज मात्र दृश्य पूर्ण बदललं आहे. पूल उभा राहिला, रस्ते आले आणि जलप्रवास थांबला. जेटीवर आता गर्दी नाही, आवाज नाही, धावपळ नाही. पाण्यावर नजर टाकली की लाटांचा मंद आवाज ऐकू येतो, पण त्यात माणसांच्या हालचालींचा गडगडाट नाही. जी जेटी कधी संघर्षाची साक्षीदार होती, ती आज एकांताची साक्षीदार झाली आहे.
ओस पडलेली ही जेटी फक्त काँक्रीट आणि लाकडाचा ढाचा नाही; ती त्या संघर्षमय प्रवासाची आठवण आहे. भीतीवर मात करत रोज जगण्यासाठी धडपडणाऱ्या लोकांची कहाणी आहे. विकासाच्या वाटेवर चालताना आपण सुरक्षितता मिळवली, पण त्या प्रवासातल्या जिद्दीच्या, सहनशक्तीच्या आणि एकमेकांवरच्या विश्वासाच्या कथा आता फक्त आठवणीत उरल्या आहेत.
आजही कुरधुंड्याच्या जेटीवर उभं राहिलं की वाटतं इथल्या पाण्यात अजूनही त्या दिवसांची घामाची धार मिसळलेली आहे, आणि वाऱ्यात अजूनही नौकांच्या आवाजाची प्रतिध्वनी घुमते आहे.

