(जैतापूर / वार्ताहर)
नाटे नगर विद्या मंदिर प्रशालेचा सन २०२४–२०२६ या शैक्षणिक वर्षातील चित्रकला परीक्षेचा निकाल अत्यंत उज्वल लागला असून, प्रशालेने सलग सहाव्या वर्षी शेकडा १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. या उल्लेखनीय यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत जितकी महत्त्वाची आहे, तितकाच मोठा वाटा ज्येष्ठ चित्रकला शिक्षक श्री. रवींद्र लिंगायत सर यांच्या निःस्वार्थ आणि सातत्यपूर्ण सेवेचा असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
७५ वर्षांहून अधिक वय असतानाही लिंगायत सर आजही तरुण शिक्षकांइतक्याच उत्साहाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता, केवळ कलेवरील प्रेम आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या आपुलकीतून ते अध्यापन करतात. नियमित सरावावर भर, प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार वैयक्तिक लक्ष, कल्पकतेला प्रोत्साहन देणारी अध्यापन पद्धत आणि संयमित समजावणी ही त्यांची शिकवण्याची वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
चित्रकला विषयाच्या एलिमेंटरी परीक्षेस एकूण २० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १० विद्यार्थ्यांनी अ श्रेणी, ९ विद्यार्थ्यांनी ब श्रेणी तर १ विद्यार्थ्याने क श्रेणी प्राप्त करत यश संपादन केले.
तसेच इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेस १३ विद्यार्थी बसले होते. यामध्ये ६ विद्यार्थ्यांनी अ श्रेणी आणि ७ विद्यार्थ्यांनी ब श्रेणी मिळवत उज्वल निकालाची परंपरा कायम राखली.
या निकालामुळे नाटे नगर विद्या मंदिर प्रशालेचे नाव परिसरात उज्ज्वल झाले आहे. लिंगायत सरांची निःस्वार्थ सेवा आजच्या काळात दुर्मीळ असल्याची भावना पालकवर्ग, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींनी व्यक्त केली आहे. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे तसेच लिंगायत सर यांचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या आरोग्यदायी दीर्घायुष्य आणि पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

