(गुहागर)
तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ न.१ येथील सभागृहात शनिवार दि. ८.३.२०२५ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ग्रामपंचायत उमराठ तर्फे गावातील कर्तृत्ववान महिलांचा, बचत गटातील महिलांचा आणि विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यीका सौ. लक्ष्मीबाई कमलाकर बिर्जे मॅडम, तसेच उमराठ गावचे सरपंच जनार्दन आंबेकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोकराव जालगावकर यांच्या सहीत मोठ्या प्रमाणात गावातील महिला भगिनी उपस्थित होत्या.
सदर प्रसंगी सुरुवातीला महान विमुती, आदराचे स्थान असलेल्या माता जिजाऊ, महिला शिक्षणाच्या प्रणत्या सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर, माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करून सरपंच जनार्दन आंबेकर, आरोग्य सहाय्यीका सौ. लक्ष्मीबाई बिर्जे मॅडम तसेच उपस्थित सर्व महिलांनी प्रतिमेना पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर प्रस्तावना करतांना सरपंच जनार्दन आंबेकर यांनी उपस्थित सर्व महिलांचे स्वागत करून जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उमराठ आरोग्यवर्धिनी केंद्राच्या आरोग्य सेविका रूचिता कदम यांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी तसेच शासनाच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून दिले जात असलेली आभा कार्ड आणि आयुष्यमान कार्ड यांचे फायदे काय आहेत ते सांगून सर्वांनी ही कार्ड्स अवस्य काढून घ्यायीत असे सांगितले. तर प्रमुख मार्गदर्शक सौ. लक्ष्मीबाई बिर्जे यांनी सुद्धा आरोग्य विषयक काळजी, नैसर्गिक येणाऱ्या मासिक पाळी बाबत समज/गैरसमज, घ्यायची काळजी, सद्या असुरक्षित परिस्थितीत महिला व किशोरवयीन मुलीनी प्रसंगानुरूप न घाबरता आपले स्वसंरक्षण कसे करावे, आपल्या कुटुंबात नेहमी सुसंवाद का असावा, आपल्या मुला-मुलींना चांगल्या /वाईट गोष्टींची जाणीव करून देणे गरजेचे का असते, मोबाईल आणि टि.व्ही.चे दुष्परिणाम इत्यादी बाबतीत उत्तम मार्गदर्शन केले.
त्या नंतर उपस्थित सर्व महिलांचा हळदीकुंकू, पुष्पगुच्छ व वाण देऊन यथोचित सन्मानीत करण्यात आले. शेवटी सरपंच जनार्दन आंबेकर यांच्यासह सर्व महिलांनी स्वच्छते विषयी शपथ घेतली की, “आम्ही उमराठ गावाच्या नागरिक आहोत. आम्ही आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शपथ घेतो की, मी माझे घर, परिसर, वाडी परिसर व गाव परिसर स्वच्छ ठेवीन. घरातील केर-कचरा मी ग्रामपंचायती मधून दिलेल्या कचरा कुंडीतच जमा करेन, इतरत्र कुठेही टाकणार नाही. तसेच मी व माझे कुटुंब नेहमी कापडी पिशवीचाच वापर करेन व इतरांना सुद्धा तसे करण्यास सांगेन” असा निर्धार उमराठच्या महिलांनी करून कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी सिद्धेश्वर लेंडवे भाऊ, कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम आणि डाटा आॅपरेटर साईस दवंडे तसेच रूचिता कदम, ऋती कदम, समृद्धी गोरिवले आणि नुतन सावंत, अपर्णा जालगावकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.