(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील पोलीसिंग अधिक नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि तंत्रज्ञानस्नेही करण्याच्या दिशेने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ‘मिशन प्रगती’ हा नाविन्यपूर्ण लोकाभिमुख उपक्रम सुरू केला आहे. मा. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम १० जुलै २०२५ पासून अंमलात आणण्यात आला असून, यामुळे तक्रारदाराला आपल्या तक्रारीच्या तपासाची सद्यस्थिती थेट मोबाईलवर मिळू लागली आहे.
नागरिक केंद्रित पोलीसिंग, कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सार्वजनिक सुरक्षितता या उद्दिष्टांना केंद्रस्थानी ठेवून रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने यापूर्वीही विविध विशेष मिशन, प्रकल्प आणि डिजिटल अॅप्लिकेशन्स सुरू केली आहेत. याच संकल्पनेचा विस्तार म्हणून ‘मिशन प्रगती’ची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
अनेकदा नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारी किंवा FIR बाबत पुढे काय झाले, तपास कुठपर्यंत पोहोचला, कोणती कार्यवाही झाली, याची माहिती तक्रारदाराला वेळेवर मिळत नाही. यासाठी त्यांना वारंवार पोलीस ठाण्याचे फेरे मारावे लागतात आणि अनावश्यक त्रास सहन करावा लागतो. हीच अडचण दूर करण्यासाठी ‘मिशन प्रगती’ची संकल्पना राबविण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या FIR संदर्भात तपासाची सद्यस्थिती व्हॉट्सअॅप आणि एसएमएसच्या माध्यमातून थेट तक्रारदाराला कळविण्यात येते. घटनास्थळ पंचनामा पूर्ण झाला आहे, आरोपीस अटक करण्यात आली आहे, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे, दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे, अशा तपासातील प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्याची माहिती फिर्यादीला दिली जाते. आतापर्यंत ‘मिशन प्रगती’ अंतर्गत जवळपास १,४५० फिर्यादींना ४,५०८ संदेश व्हॉट्सअॅप व एसएमएसद्वारे पाठविण्यात आले आहेत. या उपक्रमाचे कामकाज पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या दोन पोलीस अंमलदारांमार्फत प्रभावीपणे चालविण्यात येत आहे.
या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांनाही तपासाची माहिती सहज उपलब्ध होत असून, पोलिस यंत्रणा व जनता यांच्यातील विश्वास अधिक दृढ होत आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सर्व तक्रारदार व फिर्यादींना आवाहन केले आहे की, त्यांनी ‘मिशन प्रगती’ अंतर्गत उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा. पाठविले जाणारे संदेश हे केवळ संबंधित तक्रारीच्या किंवा गुन्ह्याच्या तपासाबाबत अद्ययावत माहिती देण्यासाठीच असतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांच्या तक्रारी प्रभावीपणे, पारदर्शकतेने आणि वेळेत मार्गी लावण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल कटिबद्ध असून, ‘मिशन प्रगती’च्या अंमलबजावणीत कोणतीही अडचण किंवा त्रुटी आढळल्यास नागरिकांनी थेट पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

