( चिपळूण )
शुक्रवार दि.१२- १२- २०२५ रोजी पुणे इंटरनॅशनल लाँगेविटी सेंटर इंडिया या संस्थेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक संघ, चिपळूणला राज्यस्तरीय कै.बी.जी.देशमुख उत्कृष्ट ज्येष्ठ नागरिक संघ म्हणून पुरस्काराचे वितरण करण्यात आले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्म विभूषण श्री.डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते आणि राज्याचे माजी पोलीस महासंचालक श्री. जयंत उमराणीकर, भारती विद्यापीठाचे कुलगुरू श्री.डॉ.शिवाजी कदम यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात संघाचे अध्यक्ष श्री उस्मान बांगी, उपाध्यक्ष श्री.उदय वेल्हाळ यांनी मंचावर जाऊन पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप चषक,सन्मानपत्र आणि १०,००० रुपये रोख असे आहे.
ज्येष्ठ नागरिक संघ, चिपळूणतर्फे सातत्याने सुरू असलेल्या उपक्रमांसाठी हा पुरस्कार देण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेल्या विरंगुळा केंद्रात करमणुकीचे,सांस्कृतिक आणि सण-उत्सव इ.घेतल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचे सर्वांनी कौतुक केले. तसेच आरोग्यशिबीर,गरीब विद्यार्थ्यांना मदत,ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी केलेले प्रयत्न इ. उपक्रमांबद्दलही सर्वांनी शाबासकी दिली. डॉ.माशेलकर यांनी आपला मोठेपणा बाजूला ठेवून रत्नमाला कळंबटे, नीला पेंडसे, मंजिरी नरवणे आणि माधवी भागवत यांच्या जवळ मनमोकळ्या गप्पा मारल्या. शिवाय आपलं कोणीतरी कौतुक करतय, अख्या महाराष्ट्रात संघाचं आणि चिपळूणचं नाव घेतलं जातंय हे सर्व या अभिमानास्पद असल्याची भावना ज्येष्ठ नागरिक संघातील सभासदांनी व्यक्त केली.
या उत्साहवर्धक सोहळ्यासाठी संघाचे शांताराम कदम, नंदकुमार तांबे, लक्ष्मण कांबळे, अ गनी वनकर, सुरेश जाधव, विजय बापट, बजरंग दाभोळे, विनायक पेंडसे, चंद्रकांत खरे, वृषाली खाडे, नीता तांबे, सुरैया बांगी उपस्थित होते. न भूतो न भविष्यति असा हा कार्यक्रम म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघ, चिपळूणला मिळालेली रौप्य महोत्सवी वर्षातील एक अमूल्य भेट ठरली.

