(रत्नागिरी / प्रतिनिधी)
चिपळूण तालुक्यातील धामणावणे, खोटवाडी परिसरात एकट्या राहणाऱ्या ६५ वर्षीय निवृत्त शिक्षिका वर्षा वसुदेव जोशी यांच्या निर्घृण खूनप्रकरणी आरोपी रविशंकर कांबळे याचा जामीन अर्ज चिपळूण न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. अनिता नेवसे यांनी फेटाळून लावला. गुन्ह्याचे गांभीर्य, आरोपीविरोधातील प्राथमिक पुराव्यांची साखळी तसेच साक्षीदारांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेता जामीन मंजूर करणे योग्य ठरणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. हा आदेश ९ जानेवारी रोजी खुले न्यायालयात सुनावण्यात आला.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड अनुपमा ठाकूर यांनी सविस्तर आणि ठाम युक्तिवाद केला. आरोपीने सहआरोपीच्या मदतीने दरोड्याच्या उद्देशाने एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ महिलेचा अत्यंत अमानुष पद्धतीने खून केल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. मृत्यूपूर्वी महिलेचे तोंड दाबून हात-पाय बांधण्यात आल्याचे तसेच घरातील दागिने व मौल्यवान वस्तू लुटल्याचे पुरावे असल्याचे ठाकूर यांनी नमूद केले.
तपासादरम्यान आरोपीकडून मृत महिलेचे सुमारे साडेचार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आल्याचे, तसेच गुन्ह्याच्या आधी रबरचे हातमोजे व स्प्रे खरेदी केल्याचे साक्षीपुरावे उपलब्ध असल्याचे सरकार पक्षाने सांगितले. सीसीटीव्ही फुटेज, पंचनामे, वैद्यकीय अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब आरोपीच्या सहभागाकडे स्पष्टपणे निर्देश करीत असल्याचेही न्यायालयासमोर मांडण्यात आले. सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड अनुपमा ठाकूर यांनी आरोपीचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहासही अधोरेखित केला. यापूर्वीही आरोपीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून काही प्रकरणांत तो फरार राहिल्याची नोंद असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपी जामिनावर सुटल्यास साक्षीदारांवर दबाव टाकण्याची तसेच न्यायप्रक्रियेत अडथळा निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि प्रकरणातील पुराव्यांचा सखोल विचार करून न्यायालयाने आरोपीविरोधात प्रथमदर्शनी ठोस पुरावे असल्याचे नमूद केले. गुन्ह्याची तीव्रता, शिक्षेचे स्वरूप आणि समाजावर होणारा परिणाम लक्षात घेता जामीन मंजूर करता येणार नसल्याचे नमूद करत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला. या निर्णयामुळे निर्घृण खूनप्रकरणातील तपास आणि न्यायप्रक्रियेला बळ मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

