(देवरुख)
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील स्वयंभू श्री देव मार्लेश्वर आणि साखरप्याची चि. सौ. का. गिरिजादेवी यांचा पारंपरिक विवाहसोहळा (कल्याणविधी) बुधवारी दुपारी ३ वाजून ४१ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर मोठ्या भक्तिभावात आणि थाटामाटात संपन्न झाला. सह्याद्रीच्या निसर्गरम्य पर्वतरांगांमध्ये सनई-चौघड्यांचे मंजुळ सूर घुमत असताना “हरहर महादेव, हरहर मार्लेश्वर”च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला.
संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या कडे-कपारीत वसलेले मार्लेश्वर देवस्थान हे महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. यंदाचा वार्षिक यात्रोत्सव ११ ते १७ जानेवारीदरम्यान साजरा होत असून, मकरसंक्रांत दिनी होणारा मार्लेश्वर-गिरिजादेवी विवाहसोहळा हा यात्रेतील मुख्य आकर्षण ठरतो. लिंगायत धर्मीय परंपरेनुसार हा पवित्र कल्याणविधी लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.
विवाहसोहळ्याची तयारी दोन दिवस आधीपासूनच मार्लेश्वर तीर्थक्षेत्री सुरू होती. बुधवारी सकाळी मार्लेश्वराची पालखी, गिरिजादेवीची पालखी आणि यजमान व्याडेश्वराची पालखी वऱ्हाडी मंडळीसह तीर्थक्षेत्री दाखल झाल्यानंतर मुलगी पाहणे, मुलाचे घर पाहणे, मागणी, पसंती, मानपान अशा सर्व पारंपरिक विधी विधीपूर्वक पार पडले. विवाहापूर्वी ३६० मानकरी यांना परंपरेनुसार निमंत्रण देण्यात आले होते.
परंपरेनुसार आंगवलीचे अणेराव मार्लेश्वरचा टोप मांडीवर घेऊन, तर लांजेकर स्वामी गिरिजादेवीचा टोप मांडीवर घेऊन बसले. पंचकलशाची मांडणी करून मंगलाष्टकांच्या गजरात रायपाटणकर स्वामी, म्हासोळकर स्वामी, धारेश्वर स्वामी आणि लांजेकर स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत विवाहसोहळा संपन्न झाला.
या ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी उपस्थिती लावली. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये घुमणारे सनई-चौघड्यांचे सूर आणि भक्तांचा जयघोष हा अनुभव भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला.
या विवाहसोहळ्याला विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्यासह चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाविकांच्या सोयीसाठी देवरूख आगाराकडून दिवसभर जादा बसफेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. तसेच आरोग्य विभाग आणि महावितरण विभागाचे पथकही तैनात होते.
मार्लेश्वर-गिरिजादेवी विवाहसोहळा यशस्वीपणे पार पडल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता, याप्रसंगी भाविकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

