(पुणे / पिंपरी)
मकरसंक्रांतीच्या दिवशीच घडलेल्या भीषण रस्ता अपघाताने अवघा महाराष्ट्र हादरला आहे. पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पिंपरीतील काळेवाडी परिसरात बुधवारी (दि. 14) दुपारी हा भीषण अपघात घडला. ऋतुजा पांडुरंग शिंदे (वय 24) आणि नेहा पांडुरंग शिंदे (वय 20, रा. पुनावळे) या दोन सख्ख्या बहिणी दुचाकीवरून बाजारात जाण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. त्या आपली गाडी आपल्या लाईनमध्ये चालवत होत्या. त्यांचा स्पिड ही जास्त नव्हता. काळेवाडी येथील धनगर बाबा मंदिरासमोरील पेट्रोल पंपाजवळ अचानक भरधाव आयशर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की दोघी बहिणी रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत दोघींनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. काही वेळापूर्वी हसत-खेळत घरातून बाहेर पडलेल्या मुली अशा अवस्थेत परत आल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी ट्रक चालक जितेंद्र निराले (रा. खलघाट, जि. धार, मध्य प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा ट्रक नागपूरवरून आला होता. या ट्रकमधून वाटाणा आणला होता. तो ट्रक रिकामा केल्यानंतर तो परतीचा प्रवास करत होता. त्याच वेळी त्याने मागून या दुचाकीला धडक दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास काळेवाडी पोलीस करीत आहेत.

