(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील श्री जाकादेवी देवस्थान खालगाव गोताडवाडी येथे देव दिवाळीनिमित्त ३ दिवशीय वार्षिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून आज देव दिवाळी यात्रोत्सवाला स्थानिकांसह जिल्हा परजिल्ह्यातील सुमारे २० हजारांपेक्षा अधिक भाविकांनी या नवसाला पावणाऱ्या जाकादेवी देवस्थानचे मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले.
आज शुक्रवार दि. २१ रोजी सकाळी नित्य पूजा करण्यात आली. सकाळी ७ वाजता देव दिवाळी यात्रोत्सवानिमित्य श्री.जाकादेवी देवस्थानच्या देवदर्शनासाठी रीघ लागली होती. भाविकांनी जाकादेवीचे मोठ्या श्रद्धेने दर्शन घेऊन प्रसन्न झाले. दुपारी १२.३० ते ३ वा. खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी -नित्य पूजा आरती, भोवत्या. रात्री १०.३० वाजता स्थानिक गोताडवाडी येथील नमनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
शनिवारी उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी ( २२ नोव्हेंबर) रोजी सकाळी नित्य पूजा- आरती, सकाळी ११ वाजता सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ ते रात्री ८ वाजेपर्यंत तीर्थप्रसाद होईल. दुपारी १ वाजता महिलांचे हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे.सायंकाळी नित्य पूजा, रात्री ८.३० वाजता आरती भोवत्या, रात्री १०.३० वाजता जाकादेवी पंचक्रोशी ओमकार ओमसाई थिएटर मुंबई यांच्यामार्फत आंधळा मागतो डोळा हा प्रसिद्ध विनोदी २ अंकी नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.
नवसाला पावणाऱ्या जाकादेवी देवस्थानच्या वार्षिक देव दिवाळी यात्रोत्सवाला रत्नागिरी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परजिल्ह्यातीलही भाविकांनी आवर्जून उपस्थिती लावल्याने खालगांव जाकादेवी देवस्थान कमिटीने समाधान व्यक्त केले.
या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. जाकादेवी देवस्थान खालगाव गोताडवाडी, श्री जाकादेवी देवस्थान मुंबई मंडळ ,श्री. कुलस्वामिनी सेवा मंडळ व महिला मंडळ खालगाव मोठ्या श्रद्धेने व भक्तीभावाने परिश्रम घेत आहेत. दशक्रोशीतील भाविकांना गावागावांतून येण्यासाठी जाण्यासाठी एसटी महामंडळाची सेवा उपलब्ध करून देण्यात आली. एस टी महामंडळाचे देवस्थान कमिटीतर्फे जाहीर मानले आहेत. देवस्थान कमिटीतर्फे जाकादेवी मंदिर परिसर आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले असून संपूर्ण परिसरातही रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरले. विक्रेते व ग्राहकांच्यासोयीच्या दृष्टीने पाणी पुरवठयासह देवस्थान कमिटीने उत्तम सोय केली होती.
(छाया -संतोष पवार,जाकादेवी)

