(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत सत्कोंडीची आगळीवेगळी ग्रामसभा नुकतीच स्व. अनंतरावजी बैकर बहुद्देशीय संकुलातील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात नेहमीप्रमाणे ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाची परंपरा कायम राखत ही सभा सरपंच सतिश थुळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे ही सभा चक्क युट्यूबवर ऑनलाईन करण्यात आली. सभेचे कामकाज कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या ग्रामस्थांना ही पाहता यावे, यासाठी हा पायंडा पाडण्यात आला. या सभेला प्रत्यक्षात व ऑनलाईन पद्धतीने ही उत्तम प्रतिसाद मिळाला. बहुदा ऑनलाईन पद्धतीने होणारी ही देशातील पहिलीच ग्रामसभा असावी, असे सांगण्यात आले.
सभेच्या सुरुवातीलाच ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत कुळ्ये यांनी स्वच्छता व कुष्टरोग निवारण्यासाठी शपथ दिली व वर्षभरात मयत झालेल्या ज्ञात अज्ञातांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये शालांत (दहावी)व उच्च माध्यमिक (बारावी) व समकक्ष परिक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिकेच्या माध्यमातून होणाऱ्या पंचम प्रकल्पाच्या कामकाजाची माहिती देण्यात आली. यावेळी प्रकल्प समन्वयक उपस्थित होते.
या सभेचे आणखी एक वेगळेपण म्हणजे या सभेला विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या विविध अडचणी संदर्भात ग्रामस्थांशी चर्चा घडवून आणली.यामध्ये महावितरणचे वीज अभियंता श्री. नागवेकर, बी एस.एन. एल चे अभियंता श्री. नितीन बैकर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष विलासराव कोळेकर, वैद्यकीय अधिकारी, शिक्षकांचे प्रतिनिधी या सर्वांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. अवेळी गावातील पथदिवे, व गावांतून जाणाऱ्या वीजेवाहीनीच्या संवर्धनासाठी झाडेझुडपे साफसफाई करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच वाढते वीजबिल, स्मार्ट मिटर, अनियमित व वारंवार खंडित होणारा व वीजपुरवठा, वाहीनीवरील असमान वीजभार व यामुळे होणारे नुकसान याबाबत ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना नागवेकरांनी समाधानकारक उत्तरे दिली. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्मार्ट वीज मिटर लावण्यासाठी प्रतिबंधासाठी निर्णय घेऊन ठराव करण्यात आला. या ग्रामसभेला संबोधित करताना नागवेकर यांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची माहिती दिली.
बी एस.एन. एल चे अभियंता नितीन बैकर यांनी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील महसूल गावात मिळणाऱ्या सेवांबद्दल ग्रामस्थांना माहिती दिली. त्यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायतीच्या अधिकृत युट्यूब चॅनेलचे अनावरण करण्यात आले. यानंतर शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या परिसरातील माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांना ए.डी. फाउंडेशनचा ए.पी.जे. अब्दुल कलाम आदर्श मुख्याध्यापक राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना जसे की, घरकुल योजना, गोठा बांधणी, गांडूळखत निर्मिती, शोषखड्डा अशा विविध योजनांचे लाभार्थी यांना अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आले. सत्कोंडी व पन्हळी गावांतील ग्रामस्थांनी मागणी केल्याप्रमाणे स्पीकरसेटचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सत्राचे निवेदन सदस्य अरुण मोर्ये यांनी केले.
या ग्रामसभेत विविध विकासकामे, लेबर बजेट याचे नियोजन करण्यात आले. गणेशोत्सवानिमित्त ग्रामस्वछता करण्याचे नियोजन करण्यात आले, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची आग्रही भूमिका मांडली. कमी उंचीच्या व शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तीसाठी ग्रामस्थांना माहिती दिली.
या सभेला सरपंच सतिश थुळ उपसरपंच चंद्रकांत मालप ग्रामपंचायत सदस्य अरुण मोर्ये, अजय काताळे, प्रणाली मालप समिक्षा घाटे ममता बंडबे निकिता शिगवण ग्रामपंचायत अधिकारी श्रीकांत कुळ्ये नवनियुक्त महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन बलेकर, पंचप्रमुख भाऊ काताळे, ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय बैकर, गावकर प्रकाश मालप, आशा वर्कर्स सुजाता खापले नेहा पवार सिआरपी संगिता मोर्ये अंगणवाडी सेविका चित्रा बैकर कमल मालप रूपाली घोसाळे, पोलिस पाटील श्रीकांत खापले, सुहानी बलेकर, मुख्याध्यापक सुभाष पालये सुशिल वासावे महेश राहणे, नागरगोजे, मोकाशी सर व बचतगटांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या ऑनलाईन सभेला ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला या कामी सदस्य अजय काताळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

