(रत्नागिरी)
जिल्ह्यातील ८४७ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत सोमवार, १४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयात घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम, १९६४ मधील नियम ३(अ), ३(ब) व ४ नुसार जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी ही अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
सन २०२५ ते २०३० या कालावधीत गठित होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती-जमाती, मागासवर्गीय व महिलांसाठी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांनी त्यांचे अधिकार संबंधित तालुक्यांचे तहसीलदार यांना प्रदान केले आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम १८२ (४) नुसार, तसेच सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिका क्र. १९७५६/२०२१ प्रकरणी ६ मे २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार, शासनाच्या १३ जून २०२५ च्या अधिसूचनेनुसार जिल्हानिहाय संवर्ग संख्या निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी ५ मार्च २०२५ रोजी जारी केलेली अधिसूचना अधिक्रमित करण्यात आली आहे.
आरक्षणाचे तपशील पुढीलप्रमाणे
अनुसूचित जाती : ३६
अनुसूचित जाती महिला : १८
अनुसूचित जमाती : ११
अनुसूचित जमाती महिला : ६
नागरिकांचा मागास वर्ग : २२९
नागरिकांचा मागास वर्ग महिला : ११५
खुला प्रवर्ग : ५७१
खुला प्रवर्ग महिला : २८६
तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या अशी आहे
मंडणगड – ४९
दापोली – १०६
खेड – ११४
चिपळूण – १३०
गुहागर – ६६
संगमेश्वर – १२७
रत्नागिरी – ९४
लांजा – ६०
राजापूर – १०१
ही आरक्षण सोडत नियमबद्ध पद्धतीने पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधित तहसीलदारांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. पुढील पाच वर्षांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांतील नेतृत्व ठरवणारी ही सोडत ग्रामपंचायतींसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

